लोणीकंद : वडगाव शिंदे (ता. हवेली) कौटुंबिक वादामधून पत्नीने ढकलल्याने पतीचा मार लागून जागीच मृत्यू झाला. हा खून लपविण्यासाठी घरामधील कपडे आणि अन्य साहित्याचा वापर करुन मृतदेह जाळून टाकण्यात आला. जळालेल्या मृतदेहाचे अवशेष गटारामध्ये टाकून देण्यात आले.खळबळ माजवून देणारी ही घटना हवेली तालुक्यातील वडगाव शिंदे गावामध्ये मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास घडली. निलेश भीमाजी कांबळे (वय ३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विद्या निलेश कांबळे (वय ३२) असे आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश आणि विद्या पतीपत्नी असून ते दोन मुलांसह वडगाव शिंदे गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ राहण्यास आहेत. निलेश याला दारुचे व्यसन होते. त्यावरुन घरामध्ये नेहमी भांडणे होत असत.मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास निलेश दारु पिऊनच घरी आलेला होता. जेवण करीत असताना दारुच्या नशेतच तो स्वत:च्याच मुलीला करकचून चावला. यावेळी मुलगी अक्षरश: कळवळली.रागाच्या भरात त्याला मुलांनी आणि विद्या हिने जोरात ढकलून लांब केले. ढकलल्यामुळे तो खाली पडला. त्याला मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घरातील कपडे व इतर साहित्य गोळा करुन मृतदेह जाळण्यात आला. त्यानंतर राहिलेले अवशेष बंदिस्त गटारात टाकून देण्यात आले. या घटनेमुळे वडगाव शिंदे गाव हादरुन गेले आहे. घटनेची माहिती मिळताच कांबळे यांच्या घराबाहेर बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. न्यायवैद्यक पथकानेही घटनास्थळावरील पुरावे गोळा केले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत लोणीकंद पोलीस ठाण्यात सुरु होते.
खळबळजनक..! लोणीकंद परिसरात मद्यपी पतीचा खून करुन पत्नीने मृतदेह जाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 19:17 IST
खून लपविण्यासाठी घरामधील कपडे आणि अन्य साहित्याचा वापर करुन पतीचा मृतदेह जाळून टाकण्यात आला.
खळबळजनक..! लोणीकंद परिसरात मद्यपी पतीचा खून करुन पत्नीने मृतदेह जाळला
ठळक मुद्देजळालेल्या मृतदेहाचे अवशेष बंदिस्त गटारामध्ये टाकले याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु