मुंबई - व्यावसायिक राजेश्वर किशोरलाल उदानी (वय ५७) हे २८ नोव्हेंबरपासून बेपत्ता झाल्याप्रकरणी त्यांच्या मुलाने पंतनगर पोलिसांना तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तपासादरम्यान राजेश्वर यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरे परिसरात आढळून आला असल्याची माहिती पंतनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिणी काळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
२८ नोव्हेंबर रोजी राजेश्वर हे घरी चार तासांसाठी बाहेर जाऊन येतो हे सांगून घरी परातलेच नाही. शेवटी संपूर्ण रात्र वाट पाहून त्यांचा मुलगा रोनक (वय ३१) याने दुसऱ्या दिवशी २९ नोव्हेंबरला पंतनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, २८ नोव्हेंबरला रात्री ९. १५ वाजता घाटकोपर पूर्व येथील पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या विक्रोळी वाहतूक चौकीसमोरील कॉर्नरला राजेश्वर ज्या कारमधून निघाले होते. ती कार सापडली. त्यानंतर ३ डिसेंबरला पनवेल येथील नेहरे परिसरात एक बेवारस कुजलेला मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहावरील शर्टमुळे राजेश्वर यांचा मृतदेह असल्याचे नातेवाईकांनी ओळख पटवली. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पनवेल येथील रुग्णालयात पाठविण्यात आला होता. ३ डिसेंबरला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आजवर पोलिसांनी २५ जणांची चौकशी केली असून मृत राजेश्वर यांच्या मोबाईल रेकॉर्डनुसार एका राजकीय व्यक्तीच्या स्वीय सहाय्यकाची देखील चौकशी करण्यात आली. तसेच सापडलेली स्विफ्ट डिझायर कर ही त्याचीच असल्याची माहिती उघड झाली. राजेश्वर यांचे घाटकोपर परिसरातच सोने विक्रीचे दुकान आहे. ही हत्या असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.