पैठण : जायकवाडी धरणाच्या जलाशयात आज एक महिला व एक पुरूष असे दोन अज्ञात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दिवाळी पाडव्या पासून पैठण तालुक्यात सातत्याने दुर्घटना घडून बळी जात असल्याने पैठण तालुका हादरला आहे. दरम्यान धरणात आढळून आलेले मृतदेह पतीपत्नी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रूग्णालयात हलविले आहेत.
येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयात धरण नियंत्रण कक्षा पासून काही अंतरावर शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एक पुरुष व एक महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या पाहणी नंतर ते पती पत्नी असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. या दाम्पत्याने धरणात आत्महत्या केली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मृत देहाजवळ एक मोबाईल व त्यात एक लिहलेली चिठ्ठी सापडली असून यावरुन दोघे पती पत्नी असावेत असा अंदाज पोलिसांनी सुद्धा वर्तविला आहे.
घटनेची माहिती जायकवाडी धरण नियंत्रण कक्षातील तांत्रिक सहायक गणेश खराडकर यांनी पैठण पोलिस ठाण्यात दिल्यानंतर तातडीने पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर ओव्हळ, मनोज वैद्य, राजू शेख, राजू आटोळे, चव्हाण, नाईक, सविता सोनार आदींनी जलाशयातून मृतदेह बाहेर काढून पैठण येथील शासकीय रूग्णालयात हलवला. घटनास्थळी आत्महत्ये पूर्वी धरणाच्या दगडी पिचिंगवर बुट, चप्पल व पाण्याची बाटली खाद्यपदार्थ इत्यादी साहित्य आढळून आले आहे. दरम्यान, हे दोघे कोण आहेत, त्यांनी आत्महत्या का केली, प्रकार नेमका काय आहे ? हे पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.