लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: वारणाली वसाहत येथील म्हैसाळ योजनेच्या कार्यालयांतर्गत सार्वजनिक स्वच्छता, उपहारगृह, दुरुस्ती कामासाठी कार्यारंभ आदेश देण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांची लाच घेताना कार्यकारी अभियंत्यासह त्याच्या जावयास रंगेहात पकडण्यात आले. कार्यकारी अभियंता सूर्यकांत मारुती नलवडे (वय ५२, मूळ रा. लिंगनुर, ता. मिरज, सध्या रा. आरवडे पार्क, सांगली) आणि त्याचा नातेवाईक राहुल शिवाजी कणेगावकर (वय ३७, रा. विजयनगर, सांगली) अशी कारवाई केलेल्या दोघांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कुपवाड रोडवरील सह्याद्री कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात सापळा लावून ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदाराला वारणाली वसाहत, पाटबंधारे कार्यालय परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, उपहारगृह, दुरुस्तीसाठी स्वीपर पुरविण्याची निविदा मिळाली होते. या कामाची वर्कऑर्डर देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे याने एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा तक्रारी अर्ज तक्रारदार कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिला होता. या अर्जाची शुक्रवारी पडताळणी केली असता नलवडे यांनी वर्कऑर्डर देण्यासाठी एक लाखाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तातडीने सापळा लावला असता नलवडे याने लाचेची रक्कम त्याचा जावई राहुल कणेगावकर याच्याकडे देण्यास तक्रारदारास सांगितले.
त्यानंतर तक्रारदाराने कुपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिरजवळ असणाऱ्या सह्याद्री कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात जाऊन राहुल कणेगावकर याची भेट घेतली. यावेळी कणेगावकर याला तक्रारदाराकडून एक लाख रुपये घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. नलवडे याच्या सांगण्यावरून कणेगावकर याने लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यकारी अभियंता नलवडे याच्यासह जावई कणेगावकर याला ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, संजय कलकुटगी, सलीम मकानदार, भास्कर भोरे, रवींद्र धुमाळ, सीमा माने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.