शेगाव (बुलडाणा ) : सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटोचे स्टेट्स व दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे गाणे ठेवणाऱ्या शहरातील दोन युवकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांनाही सोमवारी तत्काळ अटक केली.
पोलिसांचे पथक वाहनाने शहरात गस्त घालत असताना सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नागेश सुरेश गावंडे (२१), अजय श्याम घोंगे (१८, दोघेही रा. भुतबंगला परिसर शेगाव) यांच्या मोबाइलवरील इन्स्टाग्राम अकाउंटवर धार्मिक भावना दुखावणारा व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरी (स्टेट्स) म्हणून ठेवून दोन भिन्न धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. याप्रकरणी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. गुन्ह्याचा तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या नेतृत्वात योगेशकुमार दंदे, पो.हे.कॉ. गजानन वाघमारे, पो.ना. गणेश वाकेकर, पो.ना. उमेश बोरसे, पो.कॉ. विजय साळवे, पो.कॉ. बारवाल हे करीत आहेत.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा कोणताही संदेश, संभाषण, व्हिडिओ कोणीही सोशल मीडियावर प्रसारित करू नये. किंवा लाइक शेयर किंवा त्यावर कमेंट करून नये केल्यास योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. वॉटसॲप ग्रुपवर ॲडमिन असणाऱ्यांनी ग्रुपमधील सदस्यांना वेळीच सूचना द्याव्या, ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास ग्रुप ॲडमिनविरुद्ध कारवाई केली जाईल. - अनिल गोपाळ, ठाणेदार शहर