किल्लारी (जि. लातूर) : किल्लारी पाेलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या एका पाेलीस कर्मचाऱ्याने रविवारी पहाटे २.१५ वाजता रायफलीने स्वत:वर गाेळी झाडून आत्महत्या केली. उसणे पैसे परत मिळत नसल्याच्या कारणावरुन हाेत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समाेर आले. ही बाब आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे उघडकीस आली आहे. याबाबत किल्लारी पाेलीस ठाण्यात १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, उस्मानाबाद जिल्ह्यातील समुद्रवाणी येथील रहिवासी साहेबराव सावंत (वय ३८) हे किल्लारी पाेलीस ठाण्यात पाेलीस नाईक म्हणून कार्यरत हाेते. दरम्यान, त्यांच्याकडून धनराज सूर्यवंशी (रा. हालसी ता. निलंगा) याने २०१७ मध्ये ९ लाख ५० हजार रुपये उसणे म्हणून घेतले हाेते. हे पैसे परत करा म्हणून सावंत यांनी सतत विचारणा केली. त्यांना पैसे न देता उलट शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली हाेती. शिवाय, जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली हाेती. एवढी माेठी रक्कम परत मिळत नाही, उलट त्यातून त्रास हाेत आहे. या त्रासाला कंटाळलेल्या साहेबराव सावंत यांनी ठाण्यातच रविवारी पहाटे २़१५ वाजता रायफीने स्वत:वर गाेळी झाडून आत्महत्या केली. गाेळीचा आवाज ऐकून पाेलीस नाईक कृष्णा गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती पाे.नि. सुनिल गायकवाड यांना दिली. घटनास्थळाला पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पाेलीस अधिकारी मधुकर पवार, स्थागुशाचे पाे.नि. गजानन भातलवंडे यांनी भेट दिली.
छळणाऱ्यांविराेधात गुन्हा दाखल...
याबाबत सुदाम संतराम सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरुन किल्लारी पाेलीस ठाण्यात धनराज सूर्यवंशी, सलीम सय्यद, पाेलीस कर्मचारी बेग, काळे, मामडगे, चंदू पाटील, चंदू बरमदे, साेनू पाटील, राजू सूर्यवंशी, ईश्वर पाटील, गायकवाड यांच्या अन्य अशा १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील काही जणांना पाेलिसांनी अटक केली आहे. तर उर्वरित आराेपींना अटक केली जाणार आहे, असे पाेलीस अधीक्षक पिंगळे म्हणाले.
सावंत यांना तीन मुली...
उस्मानाबाद जिल्ह्यातील समुद्रवाणी येथील मूळचे रहिवासी असलेल्या पाेलीस नाईक रावसाहेब सावंत यांची काही दिवसांपूर्वीच किल्लारी पाेलीस ठाण्यात बदली झाली हाेती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन लहान मुली असा परिवार आहे. उसण्या पैशाच्या कारणावरुन हाेत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने पाेलीस ठाण्यासमाेरच नातेवाईकांनी एकच आक्राेश केला.