ठाणे - मिरा - भाईंदर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील काशिमीरा ठाकूर मॉलजवळ आज स्फोट झाला आहे. ही घटना सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. स्फोटानंतर घटनास्थळी पोलीस आणि बॉम्बशोधक पथके दाखल झाली आहेत.
या स्फोटाचं अद्याप कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या स्फोटामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. काशिमीरा ठाकूर मॉलजवळ स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी मॉलमधील संपूर्ण परिसरात शोध मोहिम सुरू केली आहे. आज सकाळी 10 वाजता स्फोट झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने रस्त्यावर प्लास्टिकचा बॉल फेकल्याने त्याचा स्फोटा झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे. तर या स्फोटाच्या आवाजाची तीव्रता कमी असल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.
गुन्हे शाखा आणि एटीएसचं पथक अधिक माहितीसाठी घटनास्थळी दाखल झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यात ज्वलनशील पदार्थ असण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या बॉलला फटाक्यांप्रमाणे वात होती अशीही माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळावरून बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि एटीएसने प्लास्टिक बॉटल, मेटल बॉल्स आणि काथ्याच्या रस्सीचे बंडल जप्त केलं असून स्फोटकाचे सॅम्पल आणि मिळालेल्या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये अहवालासाठी पाठविण्यात आल्या आहेत. हा बॉल नेमका कोणी आणि का फेकला? त्यामागे काय उद्देश होता याचा पोलीस तपास करत आहेत.