गोंदिया : केशोरी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या उमरपायली आंबेझरी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी घातपात करण्यासाठी पेरून ठेवलेले २३ जिलेटीन कांड्या, एक डायनामो, ६७ डिटोनेटर, ९० फूट इलेक्ट्रिक वायर, १० किलो स्फोटक, वायर बंडल, प्लास्टिकची सिरीज असा मोठ्या प्रमाणात साहित्य पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई ५ ऑक्टोबर करण्यात आली. केशोरी पोलिस ठाण्यांतर्गत येणार्या उमरपायली आंबेझरी जंगल परिसरात घातपात घडवून आणण्यासाठी तसेच पोलिसांना ठार मारण्यासाठी नक्षलवाद्यांनी स्फोटके पेरून ठेवले होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर व उपविभागीय अधिकारी जगदीश पांडे यांना मिळाली. त्यांनी सी६० नवेगावबांध, देवरी, विशेष अभियान पथक येथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी बिडीडीएस पथकासह सर्च ऑपरेशन ५ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. यात सदर साहित्य जप्त करण्यात आले.
केशोरी पोलीस ठाण्यात या घटनेसंदर्भात नक्षलवाद्यांविरूध्द भादंवि कलम ३०७, कलम ४,५ भारतीय स्फोटक पदार्थ कायदा, सहकलम १८, २०,२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे, सी ६० चे कमांडो, नवेगावबांध पथक, देवरी, विशेष अभियान पथक गोंदिया याच्या अधिकारी, कर्मचार्यांनी केली आहे.