नवी मुंबई : लोकडाऊनच्या कालावधीत गरिबांना मोफत पुरवण्यासाठी असलेल्या शासकीय तांदुळाचा 380 मेट्रिक टन अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. राज्याच्या विविध ठिकाणासह कर्नाटक मधून अपहार केलेल्या ता तांदुळाचा ठिकठिकाणी साठा करण्यात आला होता. या टोळीने निर्यातबंदी असतानाही अवैधरित्या शासकीय तांदुळाचा साठा करून आफ्रिकेला विकल्याचेही तपासात समोर आले आहे.
पळस्पे येथे शासकीय वापराच्या धान्याचा अवैध साठा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पनवेल शहर पोलिसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या पथकाने टेक केअर लॉजिस्टिक गोडाऊनवर छापा टाकला होता. त्याठिकाणी 110 मेट्रिक टन तांदूळ जप्त करण्यात आले होते. हे तांदूळ महाराष्ट्रासहकर्नाटक मधील शिधावाटप दुकानातला होता. लॉकडाऊन काळात गरजूंना मोफत पुरवठा करण्यासाठी शाशनाकडून हे धान्य पुरवण्यात आले होते. मात्र या टोळीने सदर धान्याचा अपहार करून ते त्याठिकाणी साठवले होते. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संजय कुमार, गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे, संदीपान शिंदे, विजय कादबाने, सहायक निरीक्षक पवन भिंगारदिवे, निलेश राजपूत, गणेश कराड, उपनिरीक्षक विक्रांत थारकर व सुनील तारमाळे यांचे पथक करण्यात आले होते. या पथकाने भिवंडी व खालापूर येथे छापे टाकून अधिक 270 मेट्रिक टन धान्य जप्त केलं. भिवंडी येथील भादाणे गावातील जय आनंद फूड कंपनी, खालापूर मधील झेनिथ इम्पॅक्ट कंपनी व जय फूड प्रोडक्ट्स याठिकाणी हा अवैध धान्यसाठा करण्यात आला होता. त्याठिकाणावरून जप्त केलेल्या एकूण शासकीय धान्याची किंमत सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये आहे. या गुन्हयात 18 आरोपींची नावे समोर आली असून त्यापैकी तिघांना बुधवारी अटक करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नवनाथ राठोड (25), सत्तार सय्यद (25) व कृष्णा पवार (45) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी नवनाथ व सत्तार हे कर्नाटकचे राहणारे असून कृष्णा हा विजापूरचा आहे.
कर्नाटक व महाराष्टातील शिधावाटप दुकानांमधून अपहार करून साठवलेला हा शासकीय तांदूळ आफ्रिकेला पाठवला जात होता. विशेष म्हणजे निर्यात बंदी असतानाही त्यांनी आजवर माल पाठवला कसा असाही प्रश्न उदभवत आहे.
या टोळीने जानेवारी ते अद्याप पर्यंत 32 हजार 827 मेट्रिक टन तांदूळ आफ्रिकेला निर्यात केल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्याकरिता वेगवेगळ्या राज्याचे शासकीय शिक्के वापरण्यात आले आहेत. यानुसार सदर टोळीविरोधात पनवेल शहर पोलिसठाण्यात जिवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या टोळीच्या मुळाशी पोचण्यासाठी परिमंडळ दोन व गुन्हे शाखा पोलिसांनी कंबर कसली आहे.