हिंगोली - जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोड्या करून पाच जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या टोळींचा पर्दाफाशकरण्यात पोलिसांना यश आले. यातील एका दरोडेखोरात अटक केली असून त्याचेकडून ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात १३ गुन्हे उघडकीस आले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
हिंगोली ग्रामीण, कळमनुरी, बासंबा पोलिस ठाणे हद्दीत मागील दोन वर्षापासून दरोडा, घरफोडी, जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने तपास सुरू केला होता. या घटनांत बाळू पंडित नामनूर (रा. गुंडलवाडी ता. कळमनुरी ह.मु. पेडगाव) याचा सहभाग असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच संजय उर्फ समीर पंडित नामनूर (रा. गुंडलवाडी ह.मु.कळमनुरी), शंकर उर्फ डिंक्या रमेश खांडेकर (रा. बामणी ता. हदगाव ह.मु. अंबानगर, सांगवी नांदेड), सयद हनिफ उर्फ हनी सयद जाफर (रा. महेबूबनगर नांदेड), सयद जाकेर उर्फ मुजफर सयद जाफर (रा. महेबूबनगर ह.मु. हिमायतनगर, नांदेड ) व अन्य पाच साथीदार असल्याचे त्याने कबुल केले. पोलिसांनी त्याचेकडून ४ लाख २१ हजारांचे सोन्याचे दागिणे, १ लाख ६० हजारांची दुचाकी व मोबाईल तसेच रोख २० हजार ५०० रूपये असा एकूण ६ लाख १ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पाच जिल्ह्यात ६० पेक्षा अधिक गुन्हे
पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या टोळीने हिंगोलीसह यवतमाळ, नांदेड, लातूर, परभणी जिल्ह्यातही धुमाकूळ घातला होता. मागील १० वर्षात त्यांचेवर दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे जवळपास ६० गुन्हे दाखल आहेत. दोन वर्षापूर्वी राज्यभरात घरफोडी करून धुमाकूळ घालणारी पूर्णा येथील टोळी पकडून सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर जिल्ह्यात ही दुसरी मोठी कारवाई आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, जमादार संभाजी लेकूळे, गजानन पोकळे, लिंबाजी वाहुळे, ज्ञानेश्वर पायघन, विठ्ठल काळे, गणेश लेकूळे, इरफान पठाण, प्रमोद थोरात, जयप्रकाश झाडे, दत्ता नागरे, गजानन पवार, रोहित मुदीराज, तुषार ठाकरे, शेख जावेद आदींच्या पथकाने केली.