औरंगाबाद : गरीब आणि गरजू महिलांना केटरिंगच्या कामाला जायचे असल्याची बतावणी करून लाखो रुपयांना त्यांची परराज्यात विक्री करणाऱ्या रॅकेटचा जवाहरनगर पोलिसांनी मंगळवारी पर्दाफाश केला. एवढेच नव्हे, तर मध्यप्रदेशात विक्री केलेल्या २४ वर्षीय विवाहितेची मुक्तता केली.
याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात रॅकेटमधील आरोपींविराधोत गुन्हा नोंदवून दोन महिलांना अटक केली. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. रंजना जोगदंड आणि जिजाबाई शिंदे, अशी अटकेतील आरोपी महिलांची नावे आहेत. जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र जाधव यांनी सांगितले की, गारखेडा परिसरातील हनुमाननगर येथील रहिवासी दोन महिला जुलै महिन्यात बेपत्ता झाल्या होत्या. याविषयी जवाहनगर ठाण्यात एका महिलेच्या आईने तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. गरीब आणि गरजू महिलांना परराज्यात केटरिंग अथवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये कामाला लावते, एका महिन्याच्या कामासाठी २५ ते ३० हजार रुपये मिळतील, अशी बतावणी करून आणि मध्यप्रदेश राजस्थानमध्ये नेऊन विक्री करतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी संशयावरून आरोपी रंजना जोगदंड हिला ताब्यात घेतले. तेव्हा तिने सांगितले की, गारखेड्यातील दोन तरुणींना तिने जिजाबाईच्या ताब्यात दिले. पोलिसांनी बोलावून जिजाबाईची कसून चौकशी केली असता शिवाजी धनेधर याच्यासोबत कामाकरिता दोन्ही महिलांना पाठविल्याचे सांगितले. पोलिसांनी शिवाजीशी संपर्क साधला असता आठ दिवसांत त्या परत येतील, असे सांगून त्याने त्याचा मोबाईल बंद केला. अधिक तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपींनी दोन्ही महिलांना मध्यप्रदेशात प्रत्येकी एक ते दीड लाखींत विकल्याचे समजले.
पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, निरीक्षक नरेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे, उपनिरीक्षक भरत पाचोळे, कर्मचारी दत्तात्रय बोटके, संदीप जाधव, समाधान काळे, महिला कर्मचारी दीपाली कोहचाडे यांचे पथक मकला (ता. महीदपूर, जि. उज्जैन, मध्यप्रदेश) येथे गेले. तेव्हा तेथील एका तरुणासोबत तिचा विवाह लावण्यात आल्याचे समजले. या बदल्यात त्या तरुणाने सीमाचा मामा असल्याची बतावणी करणाऱ्या धनेधर याला एक लाख रुपये दिल्याचे समजले. तेव्हापासून सीमाला तिच्या नवऱ्याने डांबून ठेवल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी तिची तेथून मुक्तता केली आणि तिला औरंगाबादला आणले.
आरोपींना घेतले ताब्यातसीमाची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी लगेच आरोपी जिजाबाई आणि रंजनाबाई यांना अटक केली. शिवाय आरोपी धनेधरचा शोध सुरू केला. या रॅकेटने आतापर्यंत अनेक महिलांची परराज्यात विक्री केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.