मलकापूर : महिलेची दोनदा विक्री झाल्यानंतर ती कशीबशी सुटका करून परत आल्याने रॅकेटमधील आरोपींनी चक्क तिच्या दोन मुलांचेच अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार अपहृत मुलांच्या आजोबांनी केलेल्या तक्रारीतून पोलिस तपासात उघड झाला आहे. याप्रकरणी दोन महिलांसह पाच आरोपींना अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक स्मिता म्हसाये यांच्या नेतृत्वात मलकापूर पोलिसांनी ही कारवाई केली.
मलकापूर तालुक्यातील एका गावातील आजोबांनी त्यांच्या दोन नातवांचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार मलकापूर पोलिसांनी दि. ८ जून २०२३ रोजी भादंविच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास अधिकाऱ्यांनी अपहृत मुलांच्या आईशी चर्चा केल्यानंतर धक्कादायक बाब पुढे आली. मुख्य आरोपी ब्रिजेशकुमार जुझारसिंग विश्वकर्मा (३२, रा.ग्राम यशदा, ता.नटरेज, जि.विदिशा) याने दोनदा विक्री केल्याचे तीने सांगितले. त्यानुसार मुलांच्या अपहरणाची शक्यता पाहून पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी ब्रिजेशकुमार उत्तरप्रदेशातील मथुरा येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली.
पोलिसांनी तीन वर्षीय अपहृत मुलाला उत्तर प्रदेशातील मथुरेतून ताब्यात घेतले. दुसऱ्या सात वर्षीय मुलाला मुख्य आरोपी ब्रिजेशकुमार जुझारसिंग विश्वकर्मा (३२, रा.ग्राम यशदा, ता.नटरेज, जि.विदिशा, मध्य प्रदेश) याला भोपाळ येथून ताब्यात घेतले. मुलांसह पोलिस पथक दि. ३१ जुलै २०२३ रोजी परतले. आरोपीला गजाआड करण्यात आले. तो १५ दिवसांच्या पोलिस कोठडीत होता.
आईची झाली दोनदा विक्रीआईच्या म्हणण्यानुसार तिची आधी दोन लाख रुपयांत गुजरातमधील पाकिस्तान सीमेलगत कच्छ-भूज येथे विक्री केल्याची माहिती दिली. पोलिसांनी गुजरात राज्यात मोर्चा वळवला. पथकाने आरोपी सतीश लालबहादूर राजपूत (२७, रा.आंतरजाल आदीपूर, ता.,गांधीधाम, कच्छ-भूज) याला अटक केली. तिची दुसऱ्यांदा २ लाख ६० हजारांत विक्री झाल्याची माहिती दिली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक स्मिता म्हसाये यांनी इंद्रसिंह संतोष पाटील (४३, रा. खडके, ता. एरंडोल, जि.जळगाव खान्देश) याला अटक केली. कोठडीत मुख्य आरोपी ब्रिजेशकुमार जुझारसिंग विश्वकर्मा याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने काही महिलांच्या नावाची माहिती दिली. पोलिसांनी जयाबाई उर्फ छाया नारायण सावंत (४३, रा. व्ह.ी के. कॉम्प्लेक्स, घर नंबर ३११, सुरत, गुजरात) व वनिता उर्फ अनिता राधामोहन सावंत (५४, रा. मोहनपुरा, छोटा बाजार पोलिस चौकी, मलकापूर) या दोघींना अटक केली. पोलिसांनी आतापर्यंत दोन महिलांसह पाच आरोपींना गजाआड केले. सर्व आरोपी पोलिस कोठडीत आहेत.
असा झाला पर्दाफाश..!पीडित मुलांची आई नवऱ्यासह मध्य प्रदेशात रोजगारासाठी गेली. तिथे तिचा संपर्क कंत्राटदार ब्रिजेशकुमार विश्वकर्मा याच्याशी आला. त्यानेच तिला दोनदा विकले. पण, ती कशीबशी पळून आली. तिच्या पाठीमागे ब्रिजेशकुमार हा मलकापुरात आला. त्याने पीडित मुलांना पळविले. परंंतु, लेकरांच्या सुटकेसाठी पीडित मुलांच्या आईने तोंड उघडले. त्यानुसार मलकापूर पोलिसांनी धडक कारवाई केली.