लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रॅन्क व्हिडिओ बनविण्याच्या नावाखाली तरुणी, बालकांचे अश्लील व्हिडिओ बनवून यू-ट्यूबवर प्रसारित करणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलीस दलाच्या सायबर गुन्हा अन्वेषण शाखेने शनिवारी पर्दाफाश केला. तिघांना अटक केली. मुकेश फुलपद गुप्ता (वय २९, रा.ठाणे), प्रिन्स कुमार राजू साव (२३) व जितेंद्र बैचतराम गुप्ता (२५ दोघे रा.कुरार व्हिलेज), अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ५ लॅपटॉप, ४ मोबाइल व १ कॅमेरा जप्त केला आहे. त्याच्या साहाय्याने ३०० हून अधिक अश्लील व्हिडिओ बनविल्याचे उघड झाल्याचे गुन्हा अन्वेषण शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले.
त्यांनी मरीन लाइन्स, अक्सा, गोराई, कांदिवली, जुहू बीच, बालाजी गार्डन आदी भागांत तरुणी व लहान मुलांचे व्हिडिओ बनवून लाखो रुपयांची कमाई केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यू ट्यूबवर सार्वजनिक ठिकाणी अयोग्य पद्धतीने महिलांचे अश्लील, लैंगिक चाळ्यांचे व्हिडिओ बनवून त्याला तसे नाव देऊन डाऊनलोड केले जातात, अशी माहिती राज्य महिला आयोगाला मिळाली होती. त्यांनी बीकेसीतील सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती.
त्याबाबत सह आयुक्त भारंबे, अपर आयुक्त विरेश प्रभू, सायबर विभागाच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक एस.एस. सहस्त्रबुद्धे, मौसमी पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून या टोळीचा छडा लावला. तिघे आरोपी संगणकाचा वापर करण्यात माहीर असून, त्यांनी अनेक यू ट्यूब चॅनल बनविले होते. त्यावर अश्लील व्हिडिओ पाठवीत होते.