मुंबई : वेगवेगळ्या बनावट संकेतस्थळावरुन जाहिरातीद्वारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अशाच दोन संकेतस्थळावरून एलपीजी गॅस एजन्सी देण्याच्या नावाखाली देशभरातील १० हजार ५२१ जणांना १० कोटी १३ लाख रूपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ६ जणांना सायबर पोलिसांनीअटक केली आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ डिसेंबर रोजी अशाच एका संकेतस्थळावरील जाहिरातीला भूलून तक्रारदाराला ३ लाख ६६ हजार रूपये गमाविण्याची वेळ आली आहे. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा नोंद करत सायबर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक एस. एस सहस्त्रबुध्दे, तपास अधिकारी प्रमोद खोपीकर, रवि नाळे, अमित उतेकर, गणेश शिर्के, राहुल खेत्रे, मधुबाला लावंड यांनी सुरु केलेल्या तपासात
यात, गॅस संबंधित दोन बनावट संकेतस्थळ मिळून आले. यावरून देशभरातील नागरिकांना गॅस एजन्सी देण्याचे आमीष दाखवून बिहार आणि पश्चिम बंगालमधून फसवणूक केल्याचे उघड़कीस आले. त्यानुसार दोन पथके बिहार, एक पथक पश्चिम बंगाल तर एक पथक रत्नागिरीला रवाना झाले.
अशात तांत्रिक तपासाच्या आधारे बँक खातेधारक आणि लाभार्थी अशा तिघांना बिहार मधून अटक केली. याबाबत समजताच रत्नागिरीतील आरोपीने पळ काढला. त्याचा पाठलाग करत जसगड मधून त्याला ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून वेबसाईट तयार करणारे दोन पुरुष अभियंत्यांना पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथून अटक केली. अशात अटक आरोपींच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीत, ही टोळी फेक वेबसाईट बनवून त्यावर विविध प्रकारच्या जाहिराती देतात. लोकांनी जाहिरातीवर क्लिक करताच हुबेहूब दिसणाऱ्या जाहिरातीमुळे लोक ठगांच्या जाळयात अड़कायचे. पुढे नोंदणी केल्यानंतर त्यांना बनावट इमेलद्वारे कागदपत्रे पाठविण्यात आली. त्यावर विश्वास ठेवून नागरिकांनी यात पैसे भरले. अशाप्रकारे आरोपीनी दोन वेबसाईट द्वारे देशातील १० हजार ५२१ नागरिकांची अंदाजे १० कोटी १३ लाख इतक्या रकमेची फसवणूक केली आहे. बिहार पटनामधून ही गॅंग ऑपरेट होत होती.
कर्ज देण्याच्या बहाण्यानेही गंडा
उर्वरित १२३ वेबसाईटवरून कर्ज देण्याच्या बहाण्याने बजाज फिनात्सव, बजाज इंस्टंट लोन, पेट्रोल पंप डीलरशिप स्नॅपडील नापतोल रिलायन्स टॉवर यांच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली. याबाबत अधिक तपास सुरु आहे.
तुमचीही फसवणूक झाली आहे का?
तुमचीही अशाप्रकारे फसवणूक झाली असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.