दिल्ली-
देशाच्या राजधानी दिल्लीत पोलिसांनी एका व्यक्तीला महिलांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटक केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो महिलांच्या संपर्कात यायचा. त्यानंतर चॅटिंगवरुन महिलांचा विश्वास संपादन करायचा आणि व्हिडिओ कॉल करायचा. गोड बोलून शब्दांच्या जाळ्यात महिलांना अडकवायचं, त्यांना व्हिडिओ कॉलवर कपडे काढायचा सांगायचे आणि रेकॉर्डिंग करुन त्यांना ब्लॅकमेल करायचं असा धंदा आरोपीचा सुरू होता.
१२ जानेवारी रोजी मध्य जिल्हा दिल्लीतील रहिवासी असलेल्या एका महिलेनं याची सायबर क्राइम ऑनलाइन पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. गेल्या वर्षी जुलै महिन्यात इंस्टाग्रामवर राघव चौहान नावाच्या मुलाच्या संपर्कात ही महिला आली. चॅटिंग सुरू झालं आणि मैत्रीत रुपांतर झालं. त्यानंतर व्हॉट्सअॅपवरही दोघांचं संभाषण सुरू झालं. राघव तिला दररोज मेसेज करायचा आणि अशाप्रकारे त्यानं हळूहळू महिलेचा विश्वास संपादन केला. तिचं मन जिंकलं. यानंतर एकदा व्हिडिओ कॉलवर त्यानं महिलेला कपडे काढायला भाग पाडलं. महिला देखील त्याच्या जाळ्यात ओढली गेली आणि आरोपीनं व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग केलं.
महिलेनं केलेल्या आरोपानुसार व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर राघवनं तिच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. तिनं सुरुवातीला घाबरुन १.२५ लाख रुपये राघवला दिले देखील. पण त्यानंतरही राघव थांबला नाही. त्यानं धमकी देणं सुरूच ठेवलं आणि आणखी पैशांची मागणी करू लागला. तसंच व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊ लागला. इतकंच नव्हे, तर त्यानं एकदा तक्रारदार महिलेच्या पतीला तिचा अर्धनग्न व्हिडिओ देखील पाठवला आणि ७० हजार रुपयांची मागणी केली. इथंही पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. सायबर टीमच्या तपासात आढळून आलं की आरोपी करोल बाग परिसरात आहे. टीमनं कारवाई करत आरोपीला अटक केली. आरोपीचं नाव सन्नी चौहान उर्फ राघव (२५) असल्याचं समोर आलं आहे. तो मूळचा इंदूरचा रहिवासी आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत राघवनं धक्कादायक माहिती दिली.
राघवनं इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर अनेक अकाऊंट्स तयार केले आहेत. यातून त्यानं अनेक महिलांना फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर त्यांचे मोबाइल नंबर घेऊन त्यांच्याशी तो चॅटिंग करायचा. एकदा का महिलांचा विश्वास संपादन केला की त्यांना व्हिडिओ कॉल करण्यास सुरुवात करायचा. अशाप्रकारे आपल्या बोलण्यातून महिलांना जाळ्यात ओढायचं आणि व्हिडिओ कॉलवर त्यांना कपडे काढायला सांगायचा. महिला त्यास तयार झाली की व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचा. आरोपीचं इयत्ता ११ वी पर्यंत शिक्षण झालं असून तो विवाहित आहे. पण त्याची पत्नी त्याला दोन वर्षांपूर्वी सोडून गेली आहे.