मुंबई - महापालिकेकडून निविदेद्वारे कंत्राट घेणाऱ्या एका खासगी वाहतूक व्यवसायाला धमकावून पाच लाखांची खंडणी उकळणाऱ्या आरटीआय कार्यकर्ता आणि ‘थेट संवाद’ साप्ताहिकाचा संपादक दिलीप हजारे याला काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे. साडेतीन लाखांचा हप्ता घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. हा अटक आरोपी हजारे पवई येथे राहणार असल्याचे तपास अधिकारी सचिन हिरे यांनी माहिती दिली.
फिर्यादी यांचा वाहतुकीचा व्यवसाय आहे. पालिकेच्या देवनार कत्तलखान्यातील कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये फेकायचे कंत्राट किर्यादीला मिळाले होते. मे २०१८ मध्ये दिलीप हजारे याने त्यांना संपर्क शोधून स्वतःची ओळख ‘थेट संवाद’चा संपादक आणि माहितीचा अधिकार कार्यकर्ता असल्याची सांगितली. तुमच्या कंत्राटाबाबत माहिती मिळवली असून तुम्ही पालिकेची दिलेल्या बिलांमध्ये तफावत असल्याचे सांगितले. तुमचे नाव ब्लॅकलिस्टमध्ये टाकायला सांगून कारवाई करायला सांगतो अशी धमकी देत हजारेने फिर्यादी यांच्याकडे पाच लाखांची खंडणी मागितली.
फिर्यादीने याबाबत काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय चव्हाण व पथकाने हजारेवर पाळत ठेवली. त्यानंतर पवई येथे सापळा लावून फिर्यादीकडून साडेतीन लाखांचा पहिला हप्ता घेताना त्याला रंगेहाथ जेरबंद केले आहे.