नागभीड(चंद्रपूर) - प्रियकराकडून महिलेचा खून करण्यात आल्याची घटना शनिवारी नागभीड येथील मध्यवस्तीत सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.या घटनेने नागभीड येथे खळबळ उडाली आहे.
पुजा निलकुमार बागडे ( पुजा रवींद्र सलामे ) (२७) असे मृतक महिलेचे तर विवेक ब्रम्हदास चौधरी (२६) रा.चिखलपरसोडी असे आरोपीचे नाव आहे. मृतक पुजा ही चवडेश्वरी मंदिर परिसरात आपल्या आईसोबत भाड्याचे घरी राहत होती.पुजाचे लग्न काही वर्षापूर्वी चिखलपरसोडी येथील निलकुमार बागडे नामक व्यक्तीशी झाले होते.पण फारकत झाल्याने पुजा आईसोबतच नागभीड येथे राहायला आली होती. पुजाचा पती आणि विवेक हे एकाच गावचे असल्यामुळे त्यांचे संबंध होते.त्यामुळे विवेकचे पुजाशी प्रेमसंबध होते . यामुळे विवेकचे पुजाच्या घरी जाणे येणे होते. विवेक हा पुजाला नेहमीच लग्नासाठी तगादा लावत होता, असे पुजाची आई इंदू सलामे हिने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
याच कारणावरून शुक्रवारी पुजा आणि विवेकचे जोरदार भांडण झाले होते.या भांडणाचा डूख आरोपीच्या मनात होता.शनिवारी पुजाची आई शौचास गेल्याची संधी साधून आरोपीने मागील दरवाजातून घरात प्रवेश केला व पुजाला खाली पाडून चाकूने मान चिरून काढली.क्षणार्धात पुजा रक्ताच्या थारोळ्यात पडली.अती रक्तस्त्राव झाल्याने पुजा जागीच गतप्राण झाली.विवेकचे हे अमानुष कृत्य सुरू असतांना शौचास गेलेल्या पुजाच्या आईला किंचाळी ऐकू आल्याने ती लगबगीने घरात गेली असता चाकू कमरेला खोचून विवेक मागील दाराने पळून गेला.पुजाची आई इंदू हिने लागलीच पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळ गाठले व पंचनामा करून पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात रवाना केला.दरम्यान आरोपी विवेक याने घटनेनंतर काही वेळातच पोलिसांपुढे आत्मसमर्पन केले.
नागभीड पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३०२,४५२ सहकलम ३ (२) (व्ही), अ.जा.ज.अ.प्र.का.१९८९ अन्वये गुन्हा दाखल क) केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.अधिक तपास ठाणेदार प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.