पंजाबमधील मोगा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 महिन्यांनंतर कोमातून बाहेर आलेल्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीने रचलेला कट उघड केला आहे. जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पतीने सांगितले की, पत्नीसह तिच्या प्रियकराने त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याप्रकरणी एका आरोपीला अटकही करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मेहना गावातील असून, येथे राहणारे रवी सिंग याने पत्नी रिम्पी कौर आणि तिच्या प्रियकरावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच रवीने सांगितले की, 10 डिसेंबर 2021 रोजी तो मोटारसायकलवरून घरी जात होता. वाटेत दीप सिंग आणि बहादूर सिंग मोटारसायकलवरून आले. दोघांनी त्याला थांबवले आणि भांडण सुरू केले.
16 महिन्यांनंतर कोमातून आला बाहेर
रवीने सांगितले की, त्यानंतर दोन्ही आरोपींनी त्याला त्यांच्या मोटरसायकलवरून बिलासपूर येथील बंद पेट्रोल पंपावर नेले. मोटारसायकलवरून खाली उतरल्यानंतर मेव्हण्याने त्याचे दोन्ही हात पकडले, त्यानंतर पत्नीचा प्रियकर बहादूर सिंग याने त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याला बेशुद्ध केले. बेशुद्ध पडल्यानंतर आरोपीने त्याच्या कुटुंबीयांना रस्ता अपघातात झालेल्या दुखापतीची माहिती दिली. जखमी रवी सिंगच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी मोगा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले.
रवीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला ओसवाल रुग्णालयात रेफर करण्यात आले. गंभीर दुखापतीमुळे रवी कोमात गेला. आपला मुलगा रस्ता अपघातात जखमी झाल्याचे नातेवाईक गृहीत धरत होते. जवळपास दीड वर्षानंतर जेव्हा रवी सिंह कोमातून बाहेर आला तेव्हा त्याने पत्नी रिम्पी कौरची सर्व गुपिते सर्वांसमोर उघड केली. रवीने सांगितले की, त्याच्या पत्नीचे बर्नाला जिल्ह्यातील रहिवासी बहादूर सिंग याच्याशी संबंध होते, ज्याचा तो विरोध करत होता.
पत्नीने प्रियकरसोबत रचला हत्येचा कट
पत्नी रिम्पीने तिचा प्रियकर बहादूर सिंग याच्यासोबत मिळून त्याच्या हत्येचा कट रचला. मेहना पोलीस स्टेशनने रवी सिंगच्या माहितीच्या आधारे पत्नी रिम्पी कौर, तिचा भाऊ दीप सिंग आणि प्रियकर बहादूर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दीप सिंगला अटक केली असून, रिम्पी कौर आणि तिचा प्रियकर बहादूर सिंगचा शोध सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"