मुंबई - मुलुंडच्या केळकर महाविद्यालयालगत असलेल्या झुडपात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या तरुणाची ओळख पटविण्यासाठी केईएमच्या न्यायवैद्यक पथकाने तरुणाच्या कवटीच्या आधारे चेहरा तयार केला आहे. त्यानुसार, नवघर पोलीस अधिक तपास करत आहेत.मुलुंडमधील केळकर महाविद्यालयाच्या मागे असलेल्या स्मशानभूमीजवळील ओसाड जागेत २७ जानेवारी रोजी हा मृतदेह आढळून आला होता. ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा जाळण्यात आला होता. या प्रकरणी अज्ञाताविरोधात हत्या करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा नवघर पोलिसांनी दाखल केला. त्यानंतर मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरातील हरविलेल्यांच्या नोंदीद्वारे त्यांनी तपास सुरू केला. राज्यभरातील पोलीस विभागांना याबाबत कळविण्यात आले. बेपत्ता असल्याच्या काही दाखल तक्रारींनुसार तक्रारदारांना बोलावून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यातून काहीच हाती आले नाही.अखेर, त्यांनी केईएमच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत फेस रेकग्निशन टेक्नॉलॉजीचा वापर करून मृतदेहाच्या कवटीच्या आधारे त्याचा चेहरा तयार केला. त्यानुसार जवळपास ६० टक्के मृत व्यक्ती तशी दिसत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा चेहरा आणि मृतदेहाचे फोटो असलेली ५ हजार पत्रके नवघर पोलीस मुंबईतील गर्दी तसेच झोपडपट्टी विभागात लावणार आहेत. पत्रकातील संबंधित व्यक्तीशी मिळतीजुळती काहीही माहिती असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येणार आहे.