Facebook फ्रेंडमुळे उघडलं अंकिता भंडारीच्या हत्येचं रहस्य; ३ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 10:31 AM2022-09-24T10:31:52+5:302022-09-24T10:32:56+5:30
या वादातून अंकिताने पुलकितचा मोबाईल कालव्यात फेकून दिला. काही वेळातच अंकिता आणि पुलकितमध्ये हाणामारी झाली.
ऋषिकेश - रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी प्रकरणात एकापाठोपाठ एक खळबळजनक खुलासे होत आहेत. पोलिसांनी आरोपी पुलकित आर्य, सौरभ आणि अंकित यांना अटक केली आहे. पोलिसांनी तिघांना विचारला असता, आधी सर्व आरोपी प्लॅननुसार बनावट कथा सांगत राहिले, मात्र पोलिसांनी खाकी वर्दीचा दणका दाखवल्यानंतर तिघांनीही या हत्येमागचं रहस्य उघड केले.
आरोपींनी पोलिसांना सांगितले की, १८ सप्टेंबरच्या रात्री पुलकित, अंकित आणि सौरभ यांनी अंकिताला ऋषिकेशला फिरायला जाण्याच्या बहाण्याने सोबत आणले होते. पुलकित आणि अंकित एका स्कूटीवर होते, तर अंकिता सौरभसोबत बसली होती. ऋषिकेश एम्सला बैराजमार्गे पोहोचल्याचं आरोपींनी सांगितले. इकडे चौघे खूप वेळ बोलत होते. तोपर्यंत बरीच रात्र झाली होती. त्यानंतर आम्ही निघालो. आम्ही बैराज पोस्टच्या पुढे आल्यानंतर चिला कालव्यावर थांबलो. तिथे अंकित, पुलकित आणि सौरभने दारू प्यायली. हे सर्व तिथे उपस्थित असलेली अंकिता भंडारी पाहत होती. त्यानंतर अचानक पुलकितचा अंकितासोबत वाद सुरू झाला. यावर अंकिताने रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या अनैतिक कृत्यांची माहिती कुटुंबीयांना देणार असल्याचं सांगितले. अंकिताच्या या धमकीमुळे पुलकितला राग आला आणि दोघांमधील वाद आणखी वाढला.
या वादातून अंकिताने पुलकितचा मोबाईल कालव्यात फेकून दिला. काही वेळातच अंकिता आणि पुलकितमध्ये हाणामारी झाली. पुलकितने अंकिताला चिला कालव्यात ढकलून दिले. कालव्यात पडल्यानंतर अंकिता स्वत:ला वाचवण्यासाठी धडपडत होती. परंतु पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने ती काही वेळाने बुडाली. पोलिसांनी शनिवारी चिला कालव्यातून अंकिताचा मृतदेह ताब्यात घेतला.
१९ वर्षीय अंकिता भंडारी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. ती एका रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायची. या प्रकरणी रिसॉर्ट मालक पुलकित आर्यसह ३ आरोपींना अटक केली.
पीडित अंकिता भंडारीचा मृतदेह सापडल्यानंतर सीएम पुष्कर सिंह धामी यांनी आयजीच्या नेतृत्वाखाली एसआयटी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री धामी यांनी ट्विट केले की, आज सकाळी अंकिताचा मृतदेह सापडला. या हृदयद्रावक घटनेने माझे मन खूप दुखी झाले आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक पी. रेणुका देवी यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली असून या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचसोबत रात्री उशिरा आरोपींच्या बेकायदेशीरपणे बांधलेल्या रिसॉर्टवरही बुलडोझरद्वारे कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील दोषींना सोडले जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
कसा झाला खुलासा?
अंकिताच्या मित्राच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रकरण उघड झाले आहे. अंकिताची फेसबुकवरून मैत्री जम्मूमध्ये काम करणाऱ्या पुष्पसोबत झाली होती. घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी पुष्प ऋषिकेशला पोहोचला. घटनेच्या रात्री अंकिताशी बोलल्याचे त्याने अंकिताच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना सांगितले. अंकितानं ती अडकली आहे. रिसॉर्ट मालक आणि व्यवस्थापकाने ग्राहकांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला होता. रिसॉर्ट मालक पुलकित आर्य यानेही दारूच्या नशेत अंकिताचा विनयभंग केला. पुष्पने सांगितले की, अंकिताचा फोन रात्री ८.३० वाजता बंद झाला, पुलकित आर्यला फोन केला असता त्याने सांगितले की अंकिता तिच्या खोलीत झोपली आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी पुलकित आर्यचा फोनही बंद होता.