मुंबई - फेसबुकवरून तरुणींना आपल्या प्रेमांच्या जाळ्यात ओढत, त्यांचा विश्वास संपादन करून शारीरिक संबध ठेवून लगट करून पैशासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. करण गायकवाड (वय २३) असे या तरुणाचे नाव आहे. एका २१ वर्षीय तरुणीला फसवल्याप्रकरणी तिने पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर करणला अटक केली आहे.
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर शुक्रवारी तरुणीने या प्रकरणी विक्रोळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर विक्रोळी पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३७६, ४२० अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.घाटकोपर आपल्या कुटुंबियांसह राहणारी २१ वर्षीय तरुणीची काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर करणशी ओळख झाली होती. काही दिवसांनी दोघेही एकमेकांचे चांगले मित्र बनले. पुढे करणने तरुणीला विश्वासात घेऊन त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विविध कारणे देऊन करण तरुणीजवळ पैशांची मागणी करायचा. मात्र प्रेमात फसलेली तरूणी देखील त्याला पैसे देत होती. दरम्यान, करणने तरुणीला विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथील इमारतीजवळ भेटायला बोलावले. त्यावेळी त्याने तिच्याकडे शारिरीक संबधासाठी आग्रह केला. तरुणीने त्यास नकार दिल्यानंतरही लग्नाचं आमीष दाखवून करणने मुलीवर अत्याचार केले. कालांतराने करण तरुणीकडे पैशांची मागणी करू लागला. तसेच तरुणीने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर करण उडावा-उडवीची उत्तरे देऊन बदनामी करण्याची धमकी देऊ लागला.