वसई - फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर व्हाट्स एपवर चॅटिंग केली म्हणून नालासोपारा येथे एका 18 वर्षीय तरुणाला मैत्रिणीच्या बापाने अपहरण करून केली बेदम मारहाण केली आहे. 18 वर्षीय अंकित गुप्ता या तरुणाला नालासोपारा पश्चिमेकडील गुरुकुल क्लासेसमध्ये डांबून ठेऊन मुलीचे वडिल सुनील दुबे यांनी आपल्या साथीदारांसह या तरुणाला शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास बेदम अमानुष मारहाण केली आहे. संपूर्ण प्रकरणाबाबत नालासोपारा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, अदयाप पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नसल्याची माहिती अंकितचे वडील संजय गुप्ता यांनी सांगितले.
अंकित हा कांदिवलीतील ठाकूर कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत असून तो नालासोपारा येथे राहतो. काही महिन्यांपूर्वी त्याची फेसबुकवर साक्षी दुबे या तरुणीशी ओळख झाली. नंतर एकमेकांनी मोबाईल क्रमांक दिले. त्यांचे व्हॉटस वर चॅटिंग सुरु होते. दरम्यान, यांच्या मैत्रीची प्रेमात रूपांतर झाले असावे. म्हणून साक्षीचे वडील सुनील दुबे हिने तिचा मोबाईल काढून घेऊन अंकितशी चॅटिंग सुरु केले. ३ ऑगस्टला मित्राच्या वाढदिवसासाठी रात्री ९ वाजताच्या सुमारास भाईंदर गेला होता. त्यावेळी त्याला साक्षीच्या मोबाईलवरून तिच्या वडिलांनी व्हॉटस अँपवर मेसेज करून नालासोपारा रेल्वे स्थानकाबाहेर येण्यास सांगितले. नंतर त्याला एसबीआय बॅंकेजवळ ये असा मेसेज आला. त्याप्रमाणे अंकित रात्री १० वाजता तेथे पोचला होता. तेथे साक्षीचे वडील सुनील दुबे यांनी त्याला गुरुकुल क्लासमध्ये नेऊन बंद खोलीत रितेश तिवारीच्या मदतीने लोखंडी पकड, कंबरेचा पट्टा आणि लाकडी दांडका यांनी जबर मारहाण केली. नंतर सुनील दुबे यांनी आशिष पाटील याला फोन करून माहिती दिली. त्यानंतर आशिष पाटीलने संजय गुप्ता यांना फोनवरून माहिती दिली. संजय गुप्ता गुरुकुल क्लासमध्ये आले आणि मुलाची अवस्था पाहून त्यांनी त्याला अलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर रुग्णालयाने नालासोपारा पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सुनील दुबे आणि रितेश तिवारी यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम १४१, १४७, १४८, १४९, ३२४, ४२७ आणि ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडित अंकितचा जबाब नोंदविला आहे.