नितीन गव्हाळे, अकोला: खदान पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट बनवून आणि त्यांचा खाकी वर्दीतील फोटो डीपीवर ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. फेक अकाऊंट बनविणारा व्यक्ती अनोळखी असून, तो सीआरपीएफमध्ये कार्यरत असल्याचे भासवित आहे. त्याने, अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, याप्रकरणात ठाणेदार धनंजय सायरे यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार ज्या व्यक्तीने त्यांचे फेसबुकवर फेक अकाऊंट बनविले आहे.
तो 'सीआरपीएफ'मध्ये असल्याचे भासवून गंडा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे अशा व्यक्तीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांनी केले आहे. पोलिस निरीक्षक सायरे यांचा ऐककाळी सहकारी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याशी या भामट्याने संपर्क साधुन अडचणीत असल्याचे सांगून एका बँक खात्याच्या क्रमांकावर रक्कम टाकण्यास सांगितली. मात्र, शंका आल्याने त्याने पोलिस निरीक्षक सायरे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. तेव्हा हाेत असलेला प्रकार समोर आला.
एवढेच नव्हे, तर संपर्क करण्यासाठी मोबाइल क्रमांक मागतो. मोबाइल क्रमांक दिल्यास संपर्क साधून तो गंडा घालण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत त्याने फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवून गंडा घातल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. या प्रकरणाचा सायबर पोलिसांनी तपास सुरू केला असून, लवकर त्या व्यक्तीला अटक करण्यात येईल. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.