उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने एका सेवानिवृत्त सैनिकाला अटक केली आहे. जो स्वत:ला कर्नल सांगून युवकांना लष्करात नोकरीचे आमिष दाखवून लुटायचा. अनेक युवकांशी त्याने फसवणूक केली आहे. गंगा नगर पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमाखाली या प्रकारावर गुन्हा दाखल झाला आहे. एसटीएफने जेव्हा या प्रकरणाची चौकशी सुरू केली तेव्हा आरोपीकडे ४० कोटींहून अधिक प्रॉपर्टी असल्याचा खुलासा झाला आहे.
आता एसटीएफ अधिकारी बनावट कर्नलच्या मुलाचा शोध घेत आहे. जो ही मालमत्ता सांभाळतो. मिळालेल्या माहितीनुसार, एसटीएफने जेव्हा बनावट कर्नल सत्यपाल यादवला अटक करून चौकशी केली तेव्हा अनेक खुलासे उघड झाले. पोलिसांनी सत्यपाल यांची मुले देवेंद्र आणि प्रशांत यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. इतकेच नाही तर या फ्रॉड केसमध्ये बोगस कर्नलच्या कुटुंबाचाही सहभाग आहे. युवकांची फसवणूक करून या कुटुंबाने ४० कोटींहून अधिक मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी सांगितले की, जवळपास ३४ युवकांची यांनी फसवणूक केली. ज्यात प्रत्येकाकडून १०-१५ लाख रुपये घेतले जायचे. आरोपीचा मुलगा आणि कुटुंब हे फसवणुकीचे नेटवर्क सांभाळायचा. सत्यपाल आता निवृत्त झाला आहे. त्याच्या खात्यात ४ लाख ३० हजार रुपये होते. मात्र फसवणूक करून त्याने ४० कोटींची संपत्ती बनवली. तो कर्नलचा गणवेश घालून युवकांची फसवणूक करायचा. विविध राज्यातील युवकांना सत्यपालने फसवले आहे. सोमवारी या प्रकरणी सत्यपालला अटक केली. त्यांच्याकडून ५ ऑफर लेटर, पाच शिक्के, १ प्रिंटर, बनावट ओळखपत्र जप्त केले आहे. बेरोजगार युवकांची फसवणूक करणारा सत्यपाल यादव १० वी पास आहे. २००३ मध्ये तो लष्करातील नायक पदावरून निवृत्त झाला.
एसटीएफचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणाले की, मेरठच्या कसेरु बक्सर इथं राहणाऱ्या यादवला सोमवारी आर्मी इंटेलिजेंस आणि एसटीएफने संयुक्त कारवाईत अटक केली. अटकेवेळी तो घरीच होता आणि काही युवकांना भरतीबद्दल सांगत होता. आरोपीच्या घरी सापडलेल्या एका युवकाने त्याच्या बहिणीला सैन्यातील क्लर्कपदावर भरती करण्यासाठी २ वर्षाआधी १६ लाख रुपये दिले होते. परंतु अद्याप यादवने तिला भरती केले नाही. आरोपीने काही सैन्य गणवेशातील मुलांना सोबत ठेवले होते. जेणेकरून कर्नलवर कुणालाही शंका येऊ नये. पुणे इथं तैनात असताना आरोपी कर्नलची कार चालवायचा. त्यामुळे कर्नलचे काम आणि भाषा चांगल्याप्रकारे त्याला येत होती.