कल्याण - तुझ्या नवऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध असून तुझ्या घरच्यांचा तुला त्रास असल्याचे सांगत महिलांचा विनयभंग करणाऱ्या भोंदू बाबाला खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याविरोधात भा. दं. वि. कलम 354, 506, 34 यासह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट -अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. चंद्रेश नरसी पीर असे या भोंदू बाबाचे नाव असून तो डोंबिवलीत राहतो. कल्याण पश्चिमेतील कोळवली परिसरातील एका इमारतीत गेल्या काही दिवसांपासून या भोंदू बाबाचा गोरख धंदा सुरू होता. मोहना येथे राहणारी एक महिला आपल्या चुलत बहिणीसोबत पतपेढीच्या कामासंदर्भात याठिकाणी गेली होती. त्यावेळी या भोंदू बाबाने "तुझ्यावर चुडेल आहे, ती मी काढून देतो, तुझ्या नवऱ्याचे बाहेर संबंध आहेत, तुझ्या घरच्या लोकांचा त्रास आहे असे सांगत सिगारेटचा धूर या महिलेच्या चेहऱ्यावर सोडला. त्यानंतर महिलेला सेंट लावण्याच्या बहाण्याने शरिरावर हात फिरवला. त्यानंतर या महिलेकडे पूजेसाठी 25 हजार रुपये मागत याबाबत कोणाला सांगितल्यास मंत्र -तंत्राने तुमचे नुकसान करू अशी धमकीही दिली. मात्र त्याला न जुमानता या महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यानुसार खडकपाडा पोलिसांनी कल्याण पश्चिमेतील कोळवली परिसरात जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी पूजेचे साहित्य, टाचण्या, दिवे आदी साहित्य आढळून आले. तसेच काही नागरिकही आपल्या कौटुंबिक समस्या घेऊन या बाबाकडे आल्याचे दिसले. रिक्षात किंवा बाहेर वावरताना ज्या व्यक्ती आपल्या समस्यांबाबत चर्चा करत असतील अशा लोकांना ते हेरत आणि त्यांना पुन्हा हीच पट्टी पढवत असत आणि आपल्या जाळ्यात ओढत असल्याची माहितीही उपायुक्त पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच लोकांनी अशा प्रकारच्या भोंदू बाबांवर अजिबात विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
महिलांचा विनयभंग करणाऱ्या भोंदू बाबाला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 4:33 PM
चंद्रेश नरसी पीर असे या भोंदू बाबाचे नाव असून तो डोंबिवलीत राहतो.
ठळक मुद्दे कल्याण पश्चिमेतील कोळवली परिसरातील एका इमारतीत गेल्या काही दिवसांपासून या भोंदू बाबाचा गोरख धंदा सुरू होता. या महिलेकडे पूजेसाठी 25 हजार रुपये मागत याबाबत कोणाला सांगितल्यास मंत्र -तंत्राने तुमचे नुकसान करू अशी धमकीही दिली.