उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यामध्ये एका खोट्या वधूलाही अटक करण्यात आली आहे. ही टोळी लग्न लावून देण्याच्या नावाखाली लोकांना फसवत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळीचे सदस्य जिल्ह्याबाहेरील लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायचे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
हे लोक आधी लग्न ठरवायचे आणि नंतर वस्तू खरेदीच्या नावाखाली नवरदेवाकडून मोठी रक्कम घेत. यानंतर, नवरदेव जेव्हा लग्नासाठी यायचा तेव्हा तो त्या खोट्या नवरीसोबत लग्न करायचा. आणि नंतर मग संधी साधून ही टोळी पळून जायची. मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील रहिवासी धनीराम याने कोतवाली कटरा येथे पोलिसांत तक्रार दाखल केली.
लग्नाच्या नावाखाली घेतले 1 लाख 10 हजार रुपये
सोनभद्रच्या कैठी येथील पूजा नावाच्या महिलेचे मिर्झापूर येथे 30 जानेवारी 2023 रोजी लग्न झाले होते. लग्नाच्या नावाखाली त्याच्याकडून 1 लाख 10 हजार रुपये घेतले. यानंतर वराने आपल्या नववधूसह मिर्झापूर रेल्वे स्थानक गाठले. याच दरम्यान, नववधू त्याला चकमा देऊन पळून गेली. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम 420, 406 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
अनेक वेळा केलं होतं लग्न
पोलिसांनी ही टोळी पकडली असून एक खळबळजनक खुलासा आता समोर आला आहे. पोलिसांनी पूजा आणि तिचा साथीदार प्रदीप कुमार यांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक संतोष कुमार मिश्रा यांनी सांगितलं की, आरोपी महिलेने यापूर्वीही अशाच प्रकारे अनेकवेळा लग्न केलं होतं. हे लोक लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी चालवत असत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.