मुंबई : दिल्लीतील बनावट कॉल सेंटर प्रकरणात कफपरेड पोलिसांनी मुख्य सूत्रधार शशांक दुबेसह तिघांना शनिवारी अटक केली. त्यामुळे आरोपींचा आकडा ६ वर गेला आहे. त्यांच्याकडून तब्बल १६ लॅपटॉपसह १६ मोबाइल फोन, ४ हार्ड डिस्क, १९ सिम कार्ड, वायफाय किट जप्त करण्यात आले आहे.एचडीएफसी बँकेमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने सव्वा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी तरुणीने गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये तक्रार दिली. त्याच तक्रारीच्या आधारे कफपरेड पोलिसांनी तपास सुरूकेला.बँक खात्याच्या आधारे तपास सुरू करीत पंजाब अॅण्ड नॅशनल बँकेतील खातेधारक देवरुषी शर्मा (२४) याला बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीतून टोळीसाठी बँक खाती उपलब्ध करून देणारा विक्रांत गिरी (२५) याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर जयदीप शास्त्री जाळ्यात अडकला.विक्रांतच्या चौकशीतून या टोळीचा पर्दाफाश झाला आणि पोलिसांनी कॉल सेंटर चालविणारा टोळीचा मुख्य सूत्रधार शशांक दुबे (२८) याच्यासह त्याला बेरोजगार तरुण-तरुणींची माहिती पुरविणाऱ्या मॉन्स्टर डॉट कॉम कंपनीतील कर्मचारी सोनल राणा (३५) आणि शाईन डॉट कॉम कंपनीतील कर्मचारी मनोज तिवारी (३२) यांना अटक केली. गेल्या ४ वर्षांपासून ही टोळी तरुण - तरुणींची फसवणूक करीत होती. अशा प्रकारे या टोळीने मुंबईसह संपूर्ण देशभरातील सुमारे १०० जणांना गंडा घातल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले.
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरचा म्होरक्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 03:22 IST