नवी दिल्ली: तुम्हाला अनेकदा कमी पैशात मोबाईल दिला जातोय, असे कॉल आले असतील. पण, असे कॉल फेक असतात. अशाच एका फेक कॉल सेंटरचा भांडाफोड झाला आहे. दिल्लीपोलिसांनी शहरातील रोहिणी परिसरात एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी बनावट कॉल सेंटरद्वारे कमी पैशात मोबाईलचे आमिष दाखवून लोकांकडून ऑर्डर घ्यायची आणि मोबाईलऐवजी त्यांना साबण पाठवायची. लोकांची फसवणूक करणाऱ्या या टोळीतील 53 जणांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यापैकी 46 महिला आहेत.
फसवणुकीसाठी टपाल विभागाचा वापरदिल्लीतील उपपोलिस आयुक्त प्रणव तायल यांनी सांगितल्यानुसार, आरोपी दोन बेकायदेशीर कॉल सेंटर चालवायचा आणि तेथूनच टपाल विभागाचे अधिकारी म्हणून लोकांना फोन करायचे. टपाल विभागातील एक कर्मचारी या कॉल सेंटरचा प्रमुख असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हे रॅकेट दिल्लीत बसून देशातील अनेक राज्यांतील लोकांना टार्गेट करायचे.
स्वस्तात मोबाईलचे आमिषपोलिसांनी सांगितल्यानुसा, ही टोळी लोकांना 18000 रुपयांचे दोन मोबाईल फोन फक्त 4500 रुपयांमध्ये मिळतील अशी ऑफर द्यायचे. ही ऑफर खरी वाटावी यासाठी ही टोळी इंडिया पोस्टच्या माध्यमातून लोकांना मोबाईल आणि इतर गोष्टी पाठवत असे. यासोबतच ही टोळी लोकांना कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्यायही देत असे. जेणेकरून त्यांना कुठेही संशय येऊ नये. या आमिषाला बळी पडून अनेकजण मोबाईल घ्यायचे.
मोठा मुद्देमाल जप्तटोळीच्या कार्यपद्धतीनुसार, ज्यांनी त्यांच्या ऑफरला सहमती दिली त्यांना साबण, पर्स किंवा बेल्ट असलेले बॉक्स पाठवले जायचे. यासोबतच त्यांच्याकडून पैसेही घेण्यात यायचे. पोलिसांनी या टोळीच्या रोहिणी येथील दोन कार्यालयांवर छापे टाकले. यावेळी हे मोठे रॅकेट असल्याचं उघडं झालं. यावेळी 53 जणांना अटक करण्यात आली असून, 6 संगणक, 1 बार कोड स्कॅनर, 2 बार कोड बंडल, 5 मॉडेम, 86 मोबाईल फोनसह इतर वस्तू जप्त केल्या आहेत.