नवी दिल्ली - सध्या ऑनलाईन व्यवहार करण्याकडेच सर्वांचा अधिक कल असतो. मात्र यामुळे फसवणुकीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. नवनवीन पद्धत वापरून हॅकर्स लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. बनावट कॉलकरून लोकांच्या पैशावर डल्ला मारत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. जर तुम्हाला देखील एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल आला तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. अशा लोकांना आपली वैयक्तिक माहिती देऊ नका. ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत.
दिल्लीमध्ये अशीच एक घटना घडली आहे. एका जेष्ठ नागरिकाची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. त्यांनी बँक खात्याचे डिटेल्स आणि ओटीपी शेअर केल्यामुळे त्याचं अकाऊंट आता रिकामं झालं आहे. एका झटक्यात तब्बल 12 लाख रुपये गायब झाले आहेत. जेव्हा बँकेतून याबाबत ईमेल आला तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचं समजलं. मिळालेल्या माहितीनुसार, आयपी एक्स्टेंशन परिसरात राहणारे आणि एका खासगी कंपनीतून निवृत्त झालेले गोपाळ कृष्ण अय्यर यांना गेल्या आठवड्यात संध्याकाळी एक फोन आला.
अवघ्या अर्ध्या तासात 12 लाखांचा गंडा
बँकेतून एक वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याचे सांगून अय्यर यांच्या खात्याची सर्व माहिती त्या व्यक्तीने मिळवली. गोपाळ कृष्ण अय्यर यांच्या मोबाईलवर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आलेला ओटीपीही जाणून घेतला. अय्यर यांनी ओटीपी (OTP) सांगताच त्यांच्या खात्यातून 12 लाख रुपये त्या गुन्हेगारांनी आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. अवघ्या अर्ध्या तासात 12 लाख रुपयांची रक्कम अय्यर यांच्या खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली. नंतर बँकेकडून आलेल्या ईमेलमुळे अय्यर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आलं.
फसवणुकीचा गुन्हा दाखल
बँक अधिकार्यांशी याबाबत संपर्क साधून त्यांना ही रक्कम फ्रीज करण्याची विनंती केली,पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अय्यर यांनी याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रारही केली पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. यानंतर, त्यांनी अनेक ठिकाणी लेखी तक्रार दिली, तेव्हा त्यांच्या जवळच्या पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता पोलिसांची सायबर सेल टीम याचा तपास करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.