अमेठी - उत्तर प्रदेशातील अमेठी इथं एका युवकाने ATM मधून ५ हजार रुपये काढले आणि डोक्यावर हात मारला. या युवकाच्या हातात जी नोट लागली ती पाहून त्याला धक्काच बसला. या घटनेने युवकासोबत असलेले सहकारीही हैराण झाले. ५ हजारांच्या नोटांमध्ये २०० रुपयांची एक नोट पाहून युवक त्रस्त झाला. या नोटावर लिहिलेल्या मजकुराने युवकाची झोप उडवली.
ATM मधून काढलेल्या पैशात एक २०० रुपयाची नोट बनावट आढळली. ज्यावर Full of Fun असं लिहिण्यात आले होते. युवकाने तात्काळ या प्रकाराबाबत पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी तपासणी केली परंतु पुढे कारवाई केली नाही. एटीएममधून आलेल्या बनावट नोटेची बातमी स्थानिकांमध्ये पसरली. त्यानंतर अनेकजण एटीएमजवळ जमा झाले. संतापलेल्या नागरिकांनी बँकेविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ही घटना अमेठीच्या मुशीगंज रोजवरील भाजी मार्केटमध्ये घडली आहे. याठिकाणी सोमवारी युवक एटीएममधून पैसे काढण्यासाठी आला होता. तेव्हा त्याला २०० रुपयांची बनावट नोट मिळाली. त्यानंतर युवक हैराण झाला. त्याने याबाबत लोकांना गोळा करून माहिती दिली. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा एटीएमजवळ कुठलाही गार्ड उपस्थित नव्हता. एटीएममधून बनावट नोट आल्यानंतर काही लोकांनी याबाबत फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियात बँकेविरोधात नाराजी व्यक्त केली.
पीडित युवक किशन विश्वकर्मा म्हणाला की, त्याने इंडिया १ एटीएममधून ५ हजार रुपये काढले. परंतु त्यातील २०० रुपयाची नोट बनावट होती. त्यावर फुल ऑफ फन असं लिहिण्यात आले होते. त्याचसोबत भारतीय बच्चो का बँक असा उल्लेख होता. या घटनेबाबत पोलीस अधीक्षक इलामरण म्हणाले की, बनावट नोटेबाबत आमच्याकडे कुठलीही तक्रार आली नाही. परंतु हे प्रकरण बँकेशी निगडीत आहे. त्यामुळे बँक यावर कारवाई करू शकते. पोलिसांकडे तक्रार आल्यास आम्ही योग्य ती कारवाई करू असं त्यांनी म्हटलं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"