तांदूळ-डाळ आणि बनावट कोबीनंतर आता भेसळयुक्त जिऱ्याचीही विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाजारातून जिरे विकत घेताना त्यात खडे असतील असा विचार केला जातो. पण तुम्हाला जर कोणी तुम्ही जिऱ्याच्या नावाखाली खडे खाताय असं सांगितलं तर सुरुवातीला धक्काच बसेल, विश्वास बसणार नाही पण हो हे खरं आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात दिल्लीच्या कांझावालामध्ये बनावट जिऱ्याच्या एका कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. येथे बनावट जिरे बनवले जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने या जिऱ्याच्या कारखान्यावर छापा टाकला तेव्हा तेथून तब्बल 4198 किलोहून अधिक बनावट जिरे जप्त करण्यात आले. तर 3000 किलोहून अधिक बनावट जिरे सापडले. या छाप्यात 43 वर्षीय कारखाना मालक सुरेश गुप्ता याला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान भुसा, काच आणि दगडाच्या पावडरपासून हे जिरे बनवले जात असल्याचं आढळून आलं.
बनावट जिरं आरोग्यासाठी घातक
बनावट जिरं सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतं हे यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टींवरुन स्पष्ट होतं. या कारखान्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये जमिनीवर पडलेले आणि गोण्यांमध्ये भरलेले बनावट जिरे दिसत आहेत. या जिऱ्याकडे पाहून ते बनावट असल्याचा अंदाज बांधणे जवळपास अशक्य आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
नकली ड्रायफ्रुट्स आणि भेसळयुक्त तेल
सध्या बाजारात बनावट खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. विशेषत: सण-उत्सवाच्या काळात बनावट खवा किंवा बनावट खव्यापासून बनवलेल्या मिठाईच्या बातम्या अनेकदा समोर येतात. अशातच कधी प्लॅस्टिकचा तांदूळ, नकली कोबीबाबतही बातम्या आल्या आहेत. याशिवाय, बनावट ड्रायफ्रुट्स, भेसळयुक्त तेलाची विक्री हे देखील चिंता वाढवणारं आहे. त्यामुळे वस्तुंची खरेदी करताना सतर्क राहा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.