नवी दिल्ली : बनावट चलन (Counterfeit Currency)हे प्रत्येक देशासाठी गंभीर समस्या आहे. भारतातही दरवर्षी बनावट नोटा मोठ्या प्रमाणात पकडल्या जातात. नोटाबंदीनंतर (Demonetisation) हा प्रश्न काही काळ सुटला होता, मात्र गुन्हेगार नवीन चलनाच्या बनावट नोटाही बनवू लागले. काहीवेळा बनावट नोटा अशा प्रकारे खऱ्या दिसतात की, त्यात फरक करणे कठीण होते. नुकतेच पश्चिम बंगालमधून बनावट नोटांचे असेच एक प्रकरण समोर आले आहे. मात्र, या प्रकरणात बनावट नोटा छापणाऱ्याला नशीबाने साथ दिली आणि तो पकडला गेला.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, हे प्रकरण पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, बांकुरा जिल्ह्यातील एका 59 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून बनावट नोटा आणि छपाईसाठी वापरलेला प्रिंटर जप्त केला आहे. गुरुपाद आचार्जी असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने घरी बनावट नोटा छापून बाजारात चालवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो पकडला गेला आणि लोकांनी त्याला बेदम मारहाण केली.
पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आचार्जी याने ही बनावट नोटा घरी छापल्या आणि त्या चालवण्यासाठी बिष्णुपूर पोलीस स्टेशन (Bishnupur Police Station) अंतर्गत श्यामनगर मार्केटमध्ये गेला. ही घटना बुधवारी घडली. आचार्जी हा खेळणी घेण्यासाठी श्यामनगर मार्केटमधील एका दुकानात पोहोचला होता. त्याने खेळण्यांच्या बदल्यात 500 रुपयांची बनावट नोट दिली, जी दुकानदाराने ओळखली. यानंतर स्थानिक लोक तेथे जमले आणि त्यांनी आरोपीला बेदम मारहाण केली.
याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपींची जमावापासून सुटका केली. यानंतर आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात त्याच्या घरातून 1,65,560 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. याशिवाय, एक प्रिंटर आणि सामानही सापडले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.