मुंबई - वैद्यकीय व्यवसासाचा परवाना आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून कॅन्सर आणि इतर जर्जर आजारांवर बनावट आयुर्वेदिक औषधे विक्री करून रुग्णांची फसवणूक करणाऱ्या टोळीस नेस्तनाबूत करण्यास गुन्हे शाखेस यश आले आहे. ही धडक कारवाई गुन्हे शाखा कक्ष क्रमांक १२ ने केली आहे.
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गोरेगाव पूर्वमध्ये सापळा रचला. यावेळी दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे वैद्यकीय पदवी नसूनही ते कॅन्सरसारख्या आजारावर महागड्या दरात औषधे विकत होते. ही आयुर्वेदिक औषधे आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलचा परवानाही नाही.
या दोघांकडे बनावट आयुर्वेदिक औषधे सापडली आहेत. शिवाय भस्म पावडर, तेलाच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. दोन्ही आरोपींवर कलम 419, 420, 34 आणि 33 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेला मुद्देमाल वनराई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. यातील मुख्य आरोपीविरोधात राजस्थानमध्ये अशाप्रकारचे गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.