लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांच्या नावाने अमेरिकेन सायबर गुन्हेगाराने बनावट ई-मेल अकाऊंट उघडून वेगवेगळ्या देशातील डॉक्टरांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. हा खळबळजनक प्रकार उघड झाल्यानंतर बोधनकर यांनी शनिवारी सायबर शाखेत तक्रार दाखल केली.डॉ. बोधनकर हे कोमहाड या आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेचे पदाधिकारी आहेत. या संघटनेत जगातील वेगवेगळ्या देशातील मान्यवर डॉक्टरांचा समावेश आहे. एका अमेरिकन गुन्हेगाराने डॉक्टर उदय बोधनकर यांच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार केला आणि प्रकृती खराब असल्यामुळे आर्थिक गरज असल्याचे सांगून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना / सदस्यांना मेल पाठविले. त्यातून आर्थिक मदत मागण्यात आली. अमेरिकेतील डॉ. राजाराम बगदाला यांनी एक हजार डॉलरची रक्कम पाठवली. ऑस्ट्रेलियातील एका महिला डॉक्टरने मेलमध्ये नमूद मोबाईल नंबरवर संपर्क करून आरोपीकडे विचारणा केली असता त्याने असभ्य वर्तन करून वाद घातला. त्यामुळे महिला डॉक्टरने कोमहाडच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षांकडे ही माहिती दिली. त्याचप्रमाणे डॉ. बोधनकर यांनाही सांगितले. दरम्यान, या संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. यशवंत पाटील तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी शहानिशा केली असता अमेरिकेतील एका सायबर गुन्हेगारांनी डॉ. बोधनकर यांच्या नावे बनावट ई-मेल आयडी तयार केल्याचे आणि फिलिपीन्समधील एका बँकेत खाते उघडून त्यात ही रक्कम वळती करण्याचा कट रचल्याचे उघड झाले. त्याची गंभीर दखल घेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बोधनकर तसेच नागपूरच्या पोलिसांना मेलवरून तक्रार पाठवली. डॉ. बोधनकर यांनीही शनिवारी सायंकाळी सायबर शाखेत जाऊन तक्रार नोंदविली. या प्रकारामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.शहानिशा न केल्याने फसवणूकयासंबंधाने डॉ. बोधनकर यांच्याशी संपर्क साधला असता, संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्याला फोन करून या गैरप्रकाराची माहिती दिल्याचे सांगितले. काही जणांनी शहानिशा न केल्यामुळे फसवणूक झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
उदय बोधनकर यांच्या नावे अमेरिकेत बनावट ई-मेल आयडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 11:05 PM
येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांच्या नावाने अमेरिकेन सायबर गुन्हेगाराने बनावट ई-मेल अकाऊंट उघडून वेगवेगळ्या देशातील डॉक्टरांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. हा खळबळजनक प्रकार उघड झाल्यानंतर बोधनकर यांनी शनिवारी सायबर शाखेत तक्रार दाखल केली.
ठळक मुद्देजगातील अनेक डॉक्टरांची फसवणूक करण्याचा प्रयत्न : सायबर गुन्हे करण्याचे कृत्य