ठाणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) मालवाहू वाहनांना देण्यात येणा-या योग्यता प्रमाणपत्राची बनावट प्रत तयार करून तिची तीन हजारांमध्ये विक्री करणा-या अनिल सचदेव (३२, रा. उल्हासनगर) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सोमवारी अटक केली. त्याला १० मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याच्याकडून सात बनावट प्रमाणपत्रे हस्तगत केली आहेत.ठाणे शहर आणि नवी मुंबई, वसई, कल्याण, डोंबिवली भागातील काही ट्रान्सपोर्टच्या व्यावसायिकांना अवजड वाहनांचे आरटीओ कार्यालयाकडून दरवर्षी पासिंग करणे गरजेचे असते. त्यामुळे ते आरटीओतील दलालांची मदत घेऊन ही कागदपत्रे बनवून घेण्याचे काम करतात. अशाच प्रकारे वाहनांचे आरटीओ कार्यालयाची बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक होत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे पोलीस शिपाई भगवान हिवरे यांना तनवीर शेख या तक्रारदाराकडून मिळाली होती. याच माहितीच्या अनुषंगाने शेख यांच्या व्यवसायातील दोन टेम्पोंचे ठाणे आरटीओ कार्यालयातीलबनावट फिटनेस प्रमाणपत्रबनवून दिल्याची माहिती समोर आली. याच फिटनेस सर्टिफिकेटची आरटीओकडून गुन्हे अन्वेषण विभागाने सत्यता पडताळणी केली असता,ती बनावट असल्याचे उघडझाले. त्यानंतर वरिष्ठ पोलीसनिरीक्षक नितिन ठाकरे यांच्यापथकाने शेख यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ठाणेनगरपोलीस ठाण्यात फसवणुकीचा ६ मे रोजी गुन्हा दाखल केला. बनावट फिटनेस सर्टिफिकेट बनविणारा अनिल सचदेव हा ठाणे रेल्वेस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने ६ मे २०१९ रोजी त्याला अटक केली.आरोपीच्या घरझडतीमध्ये आणखी पाच अशी एकूण सात बनावट वाहन योग्यता प्रमाणपत्रे पोलिसांनी हस्तगत केली. तीन हजारांमध्ये तो अशी बनावट प्रमाणपत्रांची विक्री करीत असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्याचे आणखी किती आणि कोण साथीदार आहेत, याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बनावट योग्यता प्रमाणपत्र देणाऱ्यास ठाण्यात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 2:44 AM