मुंबई - राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट बनावणाऱ्याला राज्य सायबर विभागाने उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. महफुज अझीम खान (21) असं या आरोपीचं नाव आहे. वकील अटलबिहारी दुबे यांच्या तक्रारीवरून सायबर विभागाने ही कारवाई केली. त्यावरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आयपी एड्रेसच्या मदतीने आग्रातून सवन अझीम नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याचा मुलगा महफुज खान त्याच्या नावावरील मोबाईल क्रमांक वापरत असल्याचे उघडकीस आले.
याप्रकरणी सायबर विभागाला मिळालेल्या माहितीनंतर त्याला कलम 41(ड) अंतर्गत नोटीस पाठवून सायबर विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सोमवारी सांगण्यात आले होते. तेथे आल्यानंतर आरोपीनेच पांडे यांच्या नावाची बनावट प्रोफाईल तयार केल्याचे निष्पन्न झाले. अखेर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. याप्रकरणी सायबर तोतयागिरी केल्याप्रकरणी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. तेथे न्यायालयाने त्याला 20 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार दुबे यांना या बनावट फेसबुक प्रोफाईलवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. पण महासंचालक पांडे फेसबुकवर दुबे यांचे फ्रेंन्ड होते. त्यानंतरही नव्या प्रोफाईलवरून त्यांना रिक्वेस्ट आल्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी याबाबत पांडे यांच्याकडे विचारणा केली असता ती फेसबुक प्रोफाईल बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अखेर दुबे यांनी याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाकडे याप्रकरणी तक्रार केली. सायबर पोलिसांंनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
25 जूनला दुबे यांना प्रथम फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यानंतर या बनावट प्रोफाईलवरून तीनवेळा दुबे यांना फ्रेंड रिक्वेस्ट आली. आरोपीने अशा प्रकारे किती व्यक्तीना रिक्वेस्ट पाठवली. महासंचालकांच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल बनवण्याचे नेमके कारण काय?, याबाबत सायबर विभाग आरोपीकडे अधिक तपास करत आहेत. तसेच आरोपीने यापूर्वीही अशाप्रकारे सायबर गुन्हा केला आहे का? याबाबतची तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिसांनी सांगितले.