औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील तलवाडा शिवारातील बनावट दारू कारखान्यात एकाच प्रकारची बनावट दारू ही वेगवेगळ्या ब्रँडचे लेबल लावलेल्या बाटल्यांमध्ये भरून ती ग्राहकांना विक्री केली जात असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे अशी दारू केवळ अवैध दारू विक्री करणाऱ्यांनाच ते ठोक दरात विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तलवाडा शिवारातील एका शेडमध्ये सुरू असलेल्या बनावट दारू कारखान्यावर छापा मारून उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दोन जणांना पकडले आणि त्यांच्याकडून सुमारे सव्वासहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. कारखान्यात बाटल्या सील करीत असताना पकडलेले योगेश एकनाथ कावले आणि पंढरीनाथ एकनाथ कावले यांना न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली. भरारी पथकाचे निरीक्षक आनंद कांबळे म्हणाले की, आरोपी राजेंद्र सावळे आणि गोपाल दवंगे यांनी शेड भाड्याने घेतले. त्यांनीच जूनच्या पहिल्या आठवड्यात हा कारखाना सुरू केल्याचे स्पष्ट झाले.
हे आरोपी सध्या पसार झाले आहेत. अटकेतील आरोपींना ते प्रती बॉक्स २५० रुपये याप्रमाणे मजुरी देत. एकाच प्रकारची बनावट दारू ते वेगवेगळ्या ब्रॅण्डचे लेबल लावलेल्या बाटल्यांमध्ये भरीत आणि त्या बाटल्यांना पॅकेजिंग मशीनद्वारे सीलबंद करीत. दारूची बाटली बनावट भासू नये, याची ते खबरदारी घेत.
अवैध दारू विक्रेतेच याचे ग्राहकविविध ठिकाणच्या हॉटेल्स आणि ढाब्यावर अधिकृत बीअर बार आणि परमिट रूम नसते. अशा ठिकाणी जेवणासाठी जाणारे ग्राहक हॉॅटेलचालकांकडे दारूची मागणी करतात. त्या ग्राहकांना ते चोरट्या मार्गाने दारूची विक्री करीत असतात. अशा हॉटेल्स आणि ढाबाचालकांना आरोपी ठोक दरात आॅर्डरप्रमाणे इंग्रजी दारूचे बॉक्स विक्री करीत. शिवाय एक आरोपी स्वत:चा ढाबा चालवितो.
प्राणघातक बनावट दारूआरोपी हे विविध प्रकारचे केमिकल एकत्र करून बनावट दारू तयारी करीत. अशा प्रकारची तयार झालेली ही दारू पिल्यास ती जीविताला धोकादायक ठरू शकते. बनावट दारूमुळे देशभरात बळी जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.