मुंबई : सोनसाखळी आणि अंगठीच्या बदल्यात सोन्याचे बिस्कीट देत असल्याचा बनाव करत, दोन ठगांनी दादरमधील एका सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्याला लुटल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी दादर पोलिस तपास करत आहेत. दादरच्या भवानी शंकर रोड परिसरात राहत असलेले ७४ वर्षीय गोविंद अग्निहोत्री हे रेल्वेतून सेवानिवृत्त झाले आहेत. शनिवारी ते एका पोळी-भाजी केंद्रावर गेले होते. परतले तेव्हा इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ दोन जण उभे होते. यातील एकाने हाक मारून अग्निहोत्री यांना बोलावले. या व्यक्तीकडे दोन सोन्याची बिस्किटे आहेत.
एक बिस्कीट मी घेतो आहे. त्या बदल्यात मी माझी सोनसाखळी आणि अंगठी त्याला देत आहे. तुम्हीही तुमच्या गळ्यातील सोनसाखळी आणि बोटातील अंगठी त्याला देऊन दुसरे बिस्कीट विकत घ्या, असे त्याने अग्निहोत्री यांना सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अग्निहोत्री यांनीही त्यांची सोनसाखळी व बोटातील अंगठी असा एकूण १० ग्रॅम वजनाचा ऐवज काढून त्या व्यक्तीला देत, त्याच्याकडून सोन्याचे बिस्कीट घेतले. ती व्यक्ती तेथून निघून गेली. अग्निहोत्रीही आपल्या घरी परतले. दुपारी चारच्या सुमारास त्यांनी ते सोन्याचे बिस्कीट मुलाला दाखवत घडलेली घटना सांगितली.
मुलाला सोन्याच्या त्या बिस्किटाबाबत संशय आला. त्याने वडिलांसोबत जवळच्या सराफाकडे जात ते बिस्कीट तपासण्यास सांगितले. सराफाने ते बिस्कीट तपासले असता, लोखंडाच्या बिस्किटावर तांब्याच्या पाण्याचा लेप देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मात्र, आपली फसवणूक झाल्याची अग्निहोत्री यांची खात्री पटली. अखेर त्यांनी दादर पोलिस ठाणे गाठून दोन अनोळखी व्यक्तींविरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे.