खामगाव: सोन्याची नकली नाणी देत फसवणूक करणाºया टोळीतील १५ जणांना खामगाव न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सर्वच १६ आरोपींना न्यायालयात हजर करण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली. यात एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
खोदकामात सापडलेली सोन्याची नाणी अर्ध्या किंमतीत देत फसवणूक करणाºया अंत्रज येथील टोळीला खामगाव विभागीय पोलिसांनी सर्च आॅपरेशन राबवून ताब्यात घेतले. यावेळी संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या २६ पैकी १६ आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींना शुक्रवारी खामगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले. तत्पूर्वी सर्वच १६ जणांची कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यामध्ये एक आरोपी पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे त्याची न्यायालयीन कोठडीत बुलडाणा येथे रवानगी करण्यात आली. शुक्रवारी दुपारी चोख पोलीस बंदोबस्तात सर्वच आरोपींना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात कोरोना तपासणीसाठी नेण्यात आले. चाचणीनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायाधीशांनी सर्वच १५ आरोपींना सोमवार १० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.