लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पंतप्रधान कार्यालयात सेक्रेटरी असल्याचे सांगून गोपनीय काम करीत असल्याचे सांगणारा पोलिसांच्या चौकशीत तोतया निघाला. गेल्या चार पाच वर्षांपासून तो आय ए एस अधिकारी असल्याचे सांगून पंतप्रधान कार्यालयात दिल्लीला कामाला असल्याचे सांगत फिरत होता. यापूर्वी त्याने धुळे येथे अशाच प्रकारे फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पंतप्रधान कार्यालयात काम करीत असल्याचे सांगून जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या संरक्षण घेऊन फिरणार्या गुजरातच्या एका तोतयाचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले होते. त्यानंतर हा दुसरा प्रकार समोर आला आहे.
वासुदेव निवृत्त तायडे (वय ५४, रा. रानवारा रो हाऊस, तळेगाव दाभाडे) असे त्याचे खरे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट १ ने त्याला अटक केली आहे.याबाबतची माहिती अशी, बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊंडेशन या संस्थेचा औंध येथे २९ मे रोजी सकाळी कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये जम्मू काश्मीर येथे मदतीसाठी रुग्णवाहिका पाठविण्याचा लोकार्पण सोहळा होता. या कार्यक्रमाला विरेन शहा, सुहास कदम, पी के गुप्त व इतर ट्रस्टी व सदस्य उपस्थित होते. त्याला पाहुणे म्हणून बोलविण्यात आले होते. त्यावेळी त्याने आपले नाव डॉ. विनय देव असे सांगितले. ते स्वत: आय ए एस या पदावर असून सध्या त्यांची ड्युटी सेक्रेटरी या पदावर पंतप्रधान कार्यालय,दिल्ली येथे आहे. ते गोपनीय काम करीत आहे, असे सांगितले. कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या पदाधिकार्यांनी त्यांच्याकडे ते कधी आय ए एस झाले, कोठे कोठे काम केले, अशी चौकशी केली. तेव्हा त्यांच्या सांगण्यातील विसंगतीमुळे या पदाधिकार्यांना संशय आला. त्यांनी तो पोलिसांकडे बोलून दाखविला.
याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितले की, पदाधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीवरुन त्यांचा शोध घेऊन तळेगाव दाभाडे येथील घरातून ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याने आपले खरे नाव वासुदेव तायडे असल्याचे कबुल केले. तो गेली चार ते पाच वर्षे अशा प्रकारे लोकांची फसवणूक करत फिरतो. धुळे येथेही २००० साली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होता, परंतु, त्यात त्याला यश मिळाले नाही. तो काहीही कामधंदा करत नाही. तोतयागिरी करत फिरतो.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर, पोलीस अंमलदार राहुल मखरे, इम्रान शेख, अभिनव लडकत व निलेश साबळे यांच्या पथकाने केली आहे.