अहमदाबाद - एक नकली क्रिकेट लीग, नकली मैदान, नकली क्रिकेटपटू, आणि नकली समालोचक उभे करून संपूर्ण डुप्लिकेट आयपीएल उभी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. या आयपीएलवर परदेशातून मोठ्या प्रमाणात सट्टा लागल होता. गुजरातमधील वडनगर येथील एका गावातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील काही लोक आयपीएलप्रमाणे एक खोटी लीग खेळवत होते. त्यावर रशियासारख्या देशातून सट्टा लावला जात होता. मात्र आता याचा भांडाफोड झाला आहे.
मेहसाणा पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौघांवरही फसवणूक, सट्टेबाजीसह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अजून एका आरोपीचा शोध सुरू आहे. तो रशियात राहत असून, तिथूनच सट्टेबाजीचा हा संपूर्ण खेळ तो चालवत होता.
मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमधील वडनगर येथील मॉलीपूर गावामध्ये काही लोकांनी एक शेतजमीन खरेदी केली. येथे क्रिकेटचं मैदान तयार करण्यात आलं. तिथे पिच तयार करून फ्लड लाईटही लावण्यात आली. मल्टिकॅम सेटअप आणि कॉमेंट्री बॉक्सही उभा करण्यात आला. सारं आयपीएलसारखं वाटावं म्हणून ही सारी व्यवस्था करण्यात आली. तसेच एका मोबाईल अॅपवरून सामन्याचं लाईव्ह प्रसारणही व्हायचं.
हा खेळ खेळण्यासाठी गावातील तरुणांना प्रति सामना ४०० रुपये देऊन समाविष्ट केलं जात असे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रशियात बसलेली व्यक्ती या सर्व डुप्लिकेट खेळाची सारी सूत्रं हलवत असे.
सट्ट्यातील रेटनुसार या नकली खेळाडूंना कधी बाद व्हायचं, कधी चौकार मारायचा याची सूचना दिली जात असे. पोलिसांनी आरोपींकडून क्रिटेक किट, स्पीकर, लाईट, मल्टिकॅमेरा सेटअप आणि अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. इथे असलेल्या नकली समालोचकांमधील एक जण हर्षा भोगलेंच्या आवाजात कमेंट्री करायचा.