मध्य प्रदेशातील जबलपूर पोलिसांनी बनावट लग्न करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी अविवाहित युवकांचं खोटं खोटं लग्न लावून त्यांच्याकडून पैसे लुबाडून पसार होते. या प्रकरणात पोलिसांनी एका महिलेसोबत तिघांना अटक केली आहे. ही टोळी चालवणारा म्होरक्या युवक आणि युवती फरार झाले आहेत. जे पती-पत्नी असून भाऊबहिण असल्याचं लोकांना सांगत होते. पोलीस आता या दोघांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.
जबलपूरच्या लार्डगंज पोलीस ठाण्यात जयप्रकाश तिवारी यांनी तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत म्हटलंय की, माझं लग्न होत नव्हतं. ज्यामुळे त्याने नातेवाईकांकडे मुली शोधाव्या असं सांगितलं होतं. त्यानंतर जयप्रकाश तिवारी यांच्या एका नातेवाईकाने रजनी तिवारी नावाच्या एका महिलेचा नंबर दिला. त्या महिलेसोबत जयप्रकाशचं बोलणं झालं. जयप्रकाशच्या मोबाईलवर रजनीनं एका मुलीचा फोटो पाठवला. अंजली असं या तरूणीचं नाव होतं. जी जयप्रकाशला आवडली त्यानंतर मुलीला भेटण्यासाठी जयप्रकाश जबलपूरला गेला.
जबलपूरच्या गोलबाजार परिसरात रजनीने मुलगी अंजली आणि तिचा भाऊ विकास तिवारी यांची भेट जयप्रकाशसोबत करून दिली. त्यानंतर हे लग्न ठरलं जयप्रकाश आणि त्याचे नातेवाईक मुलीला घेऊन कोर्टात गेले. तिथे आधीच एक वकील त्यांची वाट पाहत होता. रजनीने जयप्रकाशकडून आधारकार्ड आणि ८ हजार घेऊन वकीलाला दिले. काही वेळानंतर वकीलाने जयप्रकाश आणि अंजली यांचं एका रजिस्टरवर सही घेतली आणि आता तुमचं लग्न झालं असून संसाराला लागा असं म्हटलं.
त्यानंतर सर्वजण गोलबाजारला परत आले. तिथे रजनीने जयप्रकाश आणि त्याच्या नातेवाईकांना मुलीसाठी कपडे आणि दागिने खरेदी करण्यासाठी १ लाख १० हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर रजनी तिथून निघून गेली. याचवेळी बाईकवर बसून ४ युवक त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी स्वत: पोलीस असल्याची बतावणी केली. तुम्ही मुलीला घेऊन पळत आहात अशी धमकी देऊन त्यांच्याकडून ८५०० रुपये वसूल केले. बनावट पोलिसांशी बोलून प्रकरण शांत केल्यानंतर जयप्रकाशनं पाहिलं की अंजली आणि तिचा भाऊ पळून गेले. या घटनेनंतर जयप्रकाशला काहीच कळालं नाही. तो पुन्हा पन्ना येथे आला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्याने लार्डगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी युवकांच्या बाईकच्या नंबरवरून आशिष तिवारी याला अटक केली.
पकडलेल्या आरोपीची चौकशी केली असता त्याने माहिती दिली की, विपील जैनने सुनील ठाकूर आणि ज्योती कुशवाहने रजनी तिवारी बनून एका पार्टीला पन्नाहून लग्न करण्यासाठी जबलपूरला बोलावलं. इथं भानू जैन हा विकास तिवारी आणि भानूची बायको सुमन जैन ही अंजली तिवारी म्हणून जयप्रकाशला भेटली. याचवेळी आशिषनं मित्रांसोबत मिळून बनावट पोलिसांचा रोल केला. धमकी देऊन जयप्रकाशला आणि त्याच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले. पोलिसांनी ज्योती कुशवाहा, सुनील ठाकूर, विपीन जैन, आशिष तिवारी यांना अटक केली आहे. अद्याप भानू आणि त्याची पत्नी सुमन फरार आहे. आरोपींकडून पोलिसांनी ५८ हजार रुपये जप्त केले आहेत.