मुंबई - स्कॉर्पिओ खरेदी करताना एका तोतया लष्कर अधिकाऱ्याने बोरिवली येथे राहणाऱ्या व्यक्तीला ऑनलाईन २ लाख १७ हजारांना गंडा घातल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. तसेच या प्रकरणाचा समांतर तपास सायबर पोलीस देखील करत आहेत.
बोरिवली येथे राहणात्या व्यक्तीला जुनी चारचाकी गाडी विकत घ्यायची होती. यासाठी ते ऑनलाईन अनेक वेबसाइटवरून जुन्या चारचाकी गाड्या पाहत होते. अशातच त्यांना एका वेबसाईटवर स्कॉर्पियो गाडी विकण्यासाठी असल्याचे आढळले. यावेळी त्यांनी यातील मोबाईल क्रमांक पाहून फोन केला. मात्र, समोरील व्यक्तीने कामात व्यस्त असल्याचे सांगत फोन ठेवून दिला. त्यानंतर काही वेळातच कार खरेदी करणाऱ्या व्यक्तीला फोन आला. यावेळी त्याने लष्करी अधिकाऱ्याने असल्याचे सांगितले.
तसेच त्याने स्कॉर्पिओ गाडी तात्काळ विकायची असून त्यांची बदली झाल्याचे बतावणी केली. त्यानुसार या तोतया लष्कर अधिकाऱ्याने समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करण्यासाठी गाडीची सर्व कागपत्रे आणि त्याचे ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड पाठविले. त्यामुळे फिर्यादी व्यक्तीचा समोरच्या तोट्या व्यक्तीवर विश्वास बसला आणि त्याने फोनवरून गाडीचा २ लाख १७ हजार रुपयांना सौदा पक्का केला. त्यानुसार त्याने लष्करी अधिकाऱ्याच्या खात्यात पैसे देखील पाठविले. मात्र, ज्यावेळेस गाडीचा ताबा मागितला, त्यावेळेस आणखी पैसे मागण्यास सुरुवात झाली. तर काही दिवसातच त्याने फोन बंद केला. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.