नितीन गव्हाळे
अकोला: अकोट तालुक्यातील काही भागांमध्ये पिवळ्या दिव्याची कार घेऊन फिरणाऱ्या आणि कारवाईचा धाक दाखवून अनेकांची लाखो रूपयांनी लुबाडणूक करणाऱ्या तोतया नार्कोटिक्स अधिकाऱ्याच्यासह आणखी दोघांच्या दहीहांडा पोलिसांनी गुरूवारी उशिरा रात्री मुसक्या आवळल्या. तोतया नार्कोटिक्स अधिकारी म्हणून मिरवणाऱ्याकडून पिवळ्याची दिव्याची कार पोलिसांनी जप्त केली आहे.
अलिकडे शासकीय अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची लुबाडणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. काही महिन्यांपूर्वीच रेल्वे पोलिसांनी तोतया टीसीला अटक केली होती. गुरूवारी अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथील चार युवक नार्कोटिक्स विभागाचे अधिकारी म्हणून फिरत असल्याची माहिती दहीहांडा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांना मिळाली. त्यांनी पोलिस पथकासह चोहोट्टा बाजार येथे जावून चार युवकांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करून झडती घेतली असता, त्यांच्याकडे अनेक बनावट कागदपत्रे, स्टॅम्प, व्हिजिटिंग कार्ड आदी कागदपत्रे आढळून आले. चोहोट्टा बाजार येथील नदी शाह महेबूब शाह(३०) हा तोतया नार्कोटिक्स अधिकारी म्हणून वावरत असल्याचे समोर आले. त्याच्यासोबत त्याचे नातवाईक एजाज शाह रहमान शाह(२४), मोहसिक शाह महेमूद शाह(२३), आसिक शाह बशीर शाह(२८) तिघे रा. अचलपूर हे त्याला सहकार्य करायचे. ग्रामीण भागात फिरून अनेक नागरिकांना भेटी देऊन हे चौघेही अधिकाऱ्याच्या थाटात फिरायचे आणि तपासणी करायचा. अनेक त्रुटी दाखवून दंड आकारण्याची धमकी द्यायचे. त्यानंतर तडजोड करून रक्कम उकळायचे. असेही पोलिसांच्या तपासात समोर आले. दहिहांडा पोलिसांनी चौघांना अटक केली.
कारवर अंबरदिवा अन् नार्कोटिक्स विभागाचा बोर्ड!
दहीहांडा पोलिसांना अटक केलेला नदीम शाह हा चारचाकी वाहन, त्यावर फिरत्या पथकाचा स्टिकर लावून अधिकारी म्हणून वावरायचा. दहीहांड्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांनी या भामट्याचे पितळ उघडे पाडले. नदीम हा तोतया नार्कोटिक्स विभागाचा अधिकारी म्हणून परिसरात फिरत होता. त्याने एका चारचाकी गाडीवर अंबरदिवा लावून दिल्ली येथील नार्कोटिक्स विभागाचा अधिकारी म्हणून बोर्डही लावला होता.
अनेकांची केली लुबाडणूक
नार्कोटिक्स विभागाचा तोतया अधिकारी म्हणून वावरणाऱ्या नदीम शाह याने काही युवकांना नोकरी लावून देण्याचे देत लुबाडणूक केल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक भागात नातेवाईक असलेल्या तीन युवकांसोबत फिरून कारवाई करण्याची धमकी देत, पैसे उकळल्याचेही समोर आले आहे.
एनसीबीचे अधिकारी दाखल
अंमली पदार्थ नियंत्रण विभाग(एनसीबी) ही एक भारतीय केंद्रीय कायदा अंमलबजावणी आणि गुप्तचर संस्था असून भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्याच्या तरतुदींनुसार अंमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर पदार्थांच्या वापराशी लढा देण्याचे काम एजन्सीकडे आहे. आरोपी नदीम शाह हा नार्कोटिक्स विभागाचा अधिकारी म्हणून वावरत असल्याने, दहीहांडा पोलिसांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार एनसीबीचे अधिकारी अकोल्यात दाखल झाले आहेत.