मुंबई - फसवणुकीच्या गुन्ह्यांतील तीन तोतया पोलिसांना धारावीपोलिसांनी अटक केली. मोहम्मद माजिद नियामुद्दीन खान, मोहम्मद आझाद इम्तियाज शेख आणि इक्बाल अब्बास शेख अशी या तीन आरोपींची नावे आहेत. विलास यशवंत कांबळे (वय 54) हे गोवंडी परिसरात राहतात. ते घरी जाण्यासाठी निघाले होते. धारावी बसस्टॉपच्या दिशेने जात असताना तिथे तीन तरुण आले. आपण पोलीस असल्याचे सांगून त्यांनी त्यांना अंगावरील सोन्याचे दागिने वॉलेटमध्ये ठेवण्यास सांगितले. शहरात लुटमारीच्या घटना वाढीस लागल्या आहेत, कुठे आणि कधी चोरट्यांकडून घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्यांचे दागिने पळविले जातील, अशी बतावणी करून त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी सोन्याची चैन आणि तीन अंगठी असा 63 हजार रुपयांचे दागिने त्यांच्या वॉलेटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान या तिघांनी हातचलाखीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने घेऊन तेथून पलायन केले होते. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर कांबळे यांनी धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांनतर पोलिसांनी तपास करत तिथे तिन्ही तोतया पोलिसांना अटक केली.
फसवणुकीच्या गुन्ह्यांतील तीन तोतया पोलीस जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 8:58 PM