उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका खोट्या पोलीस इन्स्पेक्टरला पकडण्यात आलं आहे. पोलिसांचा गणवेश घालून तो लोकांवर दादागिरी करत होता. एवढंच नाही तर त्याने वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली होती. गेली चार वर्षे लोक त्याला खरा इन्स्पेक्टर मानत होते. मात्र आता त्याचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पकडल्यानंतर पोलिसांसमोर तो भीतीने थरथरत होता.
आरोपी हा केवळ पाचवी पास असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात त्याने 4 हजार रुपये खर्च करून गणवेश शिवून घेतला होता. तेव्हापासून तो खोटा पोलीस इन्स्पेक्टर बनून फिरत होता. मात्र बेकायदेशीरपणे वाहनं अडवली जात असल्याची माहिती कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी आग्रा पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला रंगेहात पकडलं.
देवेंद्र उर्फ राजू असं आरोपीचं नाव आहे. तो न्यू आग्रा पोलीस स्टेशनच्या अबुल उलाह कट येथे वाहनांची तपासणी करत होता. तसेच चेकिंग दरम्यान तो वाहनांकडून पैसे गोळा करून खिशात ठेवत होता. वाहनांची तपासणी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. चौकशी केल्यानंतर इन्स्पेक्टर बनावट असल्याचे स्पष्ट झाले. अशा स्थितीत त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान देवेंद्रची सर्व गुपितं उघड झाली. तो आग्रा येथील राजपूर चुंगी भागातील रहिवासी असल्याचे समोर आले. देवेंद्रकडून 2 हजार रुपये जप्त करण्यात आले.
देवेंद्रने पोलिसांना सांगितलं की, लॉकडाऊनच्या काळात तो गणवेश घालूनच रस्त्यावर यायचा. गणवेशामुळे त्याला कोणी अडवले नाही. हे पाहून त्याची हिंमत वाढली आणि त्याने गणवेश घालून ऑटो आणि बसमध्ये मोफत प्रवास सुरू केला. तो गणवेश परिधान करून खरेदीसाठी ज्या दुकानात जायचा तेथे त्याला सवलत मिळत असे.
या सर्व कारणांनंतर त्याची हिंमत एवढी वाढली की त्याने बेकायदेशीरपणे वाहनांकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी देवेंद्रचं खोटं उघडं पडल्याने तो पकडला गेला. आता देवेंद्र तुरुंगात असून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.