जळगाव : मुंबई येथे सोने खरेदीसाठी रक्कम घेऊन जाणाऱ्या वाहनाला अडवून त्यातील पाच कोटी ४० लाख रुपये लुटून नेण्यात आले. ही घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र जळगावात याविषयी कोणाचीही तक्रार नाही. लुटीची ही रक्कम प्रत्यक्षात सात कोटी रुपये असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
काही दिवसांपूर्वी जळगावातील २० ते ३० सुवर्ण व्यावसायिकांची रक्कम एकत्रित करून मुबंई येथे सोने खरेदीसाठी नेण्यात येत होती. नाशिक ते मुंबई दरम्यान शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ढाब्याजवळ हे वाहन अडवून त्यातील रक्कम लुटून नेली. या विषयी संबंधित वाहन धारकांनी शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिस असल्याची बतावणी अन् तपासणीजळगावातून एका कुरिअरच्या वाहनातून ही रक्कम नेण्यात येत होती. शहापूरनजीक एका ढाब्याजवळ पोलिस असल्याची बतावणी करून काही जणांनी वाहनाची तपासणी केली. त्यावेळी वाहनातील रक्कम लुटून नेण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये मुंबई पोलिस दलातील एक कर्मचारी असल्याचेही सांगण्यात येते.