लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन आणि अवघा समाजच विविध उपापययोजना करीत असताना काही समाजकंटक मात्र आपले खिसे भरण्यासाठी कामी लागल्याचे धक्कादायक वास्तव नागपुरात उघड झाले आहे. बनावट सॅनिटायजर तयार करून ते विविध मेडिकल स्टोर्समधून विकण्याचे प्रयत्न चालविणाऱ्या दोन भामट्यांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. विक्की जयराम खानचंदानी (वय ४०) आणि जितेंद्र जयकिशन मुलानी (वय ४२) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही जरीपटक्यात राहतात.राज्यात कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता राज्य शासनाने विविध उपाययोजना जारी केल्या आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क आणि सॅनिटायजरची मागणी अचानक वाढली. ती लक्षात घेत गल्लाभरू वृत्तीच्या मंडळींनी त्याचा काळाबाजार करणे सुरू केले आहे.
जादा दरात ते विकले जात आहेत. एकीकडे हे चित्र असताना शुक्रवारी जरीपटक्यातील आरोपी विक्की खानचंदानी याने बनावट सॅनिटायजरच्या बाटल्या एमआयडीसीतील विविध मेडिकल स्टोर्सच्या संचालकांना विकण्याचे प्रयत्न केले. विविध मेडिकल स्टोर्समध्ये संपर्क साधून ५० आणि १५ मिलिलिटरच्या बाटल्या भरलेले सॅनिटायजर विकण्याचा प्रयत्न करत होता. एका जागरूक मेडिकल स्टोर्सच्या संचालकाला हे सॅनिटायजर बनावट (भेसळयुक्त) असल्याचे लक्षात आले. त्यांनी आपले नाव गुप्त ठेवण्याची अट घालून शुक्रवारी सायंकाळी या भामट्याला गुंतवून ठेवले आणि त्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविली. पोलिसांनी लगेच धाव घेत खानचंदानीला ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सॅनिटायजरच्या १०० एमएलच्या ५० बाटल्या तसेच १५ एमएलच्या दोन बाटल्या जप्त करण्यात आल्या. या बाटल्या कुठून आणल्या, अशी विचारणा केली असता त्याने जितेंद्र मुलानीचे नाव सांगितले. त्यावरून पोलिसांनी मुलानीची शोधाशोध करून शनिवारी सकाळी त्याला ताब्यात घेतले. एमआयडीसीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे, द्वितीय निरीक्षक राजेश पुकळे, उपनिरीक्षक देवानंद बगमारे, नायक मंगेश गर्व, शिपाई अमोल ठाकरे आणि विक्की मेश्राम यांनी ही कामगिरी बजावली.
नागपुरात बॉटलिंग !सूत्रांच्या माहितीनुसार, हे रॅकेट नेमके कोण आणि कुठून संचलित करीत आहे, ते अजून उघड झाले नाही. मात्र, बनावट सॅनिटायझरचा कच्चा माल मध्य प्रदेशातून नागपुरातून पाठविला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही या रॅकेटचे नेटवर्क असून, नागपुरात मोठ्या प्रमाणात बॉटलिंग करून ते बाजारात पाठविले जात असल्याचीही माहिती पुढे आली आहे. या रॅकेटने अनेक ठिकाणी बनावट सॅनिटायझर विकण्यासाठी ठेवल्याचीही माहिती आहे. पोलिसांच्या मर्यादा, तपासात अडचणविशेष म्हणजे, ज्या कलमानुसार खानचंदानी आणि मुलानीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात त्यांना अटक केली जाऊ शकत नसल्याचे पोलीस सांगतात. अटकच केली गेली नसल्याने त्यांच्याकडून पाहिजे त्या पद्धतीने गुन्ह्याची माहिती काढून घेण्यात पोलिसांना अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी या गंभीर प्रकरणात गंभीरपणे लक्ष घालण्याची गरज आहे. तसे झाले तरच महामारी म्हणून घोषित झालेल्या आणि त्यामुळे आधीच भयभीत असलेल्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या समाजकंटकांवर कायद्याचा चाबूक ओढला जाऊ शकतो.