लखनौच्या चारबाग रेल्वे स्टेशनवर एका खोट्या महिला टीटीईला पकडण्यात आलं आहे. ती टीटीईचा गणवेश घालून, गळ्यात आयकार्ड आणि हातात पेन-पेपर घेऊन प्रवाशांचं तिकिट तपासत होती. पण चौकशीदरम्यान, ती तिच्या पोस्टिंगबद्दल किंवा विभागाची इतर माहिती सांगू शकली नाही. संशयावरून तिला ताब्यात घेण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, काजल सरोज असं महिलेचं नाव आहे. ती फक्त २२ वर्षांची आहे. तिच्याकडे एक खोटं आयकार्ड सापडलं, ज्यावर तिचं नाव, पत्ता आणि कर्मचारी क्रमांक इत्यादी होतं. पण जेव्हा स्टेशन अधीक्षक अरविंद बघेल यांनी चौकशी केली तेव्हा त्यांच्या कर्मचारी नंबर, पदनाम आणि पोस्टिंगचं ठिकाण हे सर्व खोटं असल्याचं आढळून आलं.
एका महिला टीसीने काजलला वेटिंग रूमच्या वॉशरूममध्ये टीटीईच्या वेशात तिकिट तपासताना पाहिलं तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. तिने ताबडतोब अधिकाऱ्यांना ही बाब कळवली, ज्यांनी नंतर काजलला अटक केली. आरोपीविरुद्ध जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तिची चौकशी करत आहेत आणि उर्वरित माहिती मिळवत आहेत.
अधिकाऱ्यांनी पाहिलं की काजलच्या आयकार्डवर तिची जन्मतारीख १६ मार्च २००२ होती आणि नियुक्तीची तारीख २५ मार्च २०२१ होती. रेल्वेच्या नियमांनुसार, टीटीई पदावर थेट नियुक्ती होत नाही, तर पुरुष/महिला टीसींना टीटीई बनण्यासाठी पदोन्नती दिली जाते. यासाठी सुमारे १४ ते १५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. पण काजल वयाच्या २२ व्या वर्षी टीटीई म्हणून फिरत होती.