- प्रज्ञा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : असामाजिक प्रथेला झुगारत असताना प्रथम नैराश्येत गेलेल्या आणि नंतर मानसिक रुग्ण झालेल्या तरुणीवर ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने उपचार केले खरे. परंतु, आता प्रश्न उभा राहिलाय तो तिच्या पुनर्वसनाचा. पुन्हा त्या असामाजिक प्रथा असलेल्या कुटुंबात जाण्यास नकार देणाऱ्या या २८ वर्षीय तरुणीचे पुनर्वसन कसे आणि कुठे करायचे, असा प्रश्न मनोरुग्णालय प्रशासनासमोर आहे. कुटुंबात चालत आलेल्या देहविक्रेयच्या कुप्रथेला विरोध करून मनोरुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेल्या या तरुणीला स्वत:च्या पायावर उभे राहायचे आहे. तिच्या पुनर्वसनासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची इच्छा मनोरुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली आहे.
मध्य प्रदेश येथील मंदसौर जिल्ह्यातील उतपुरा गावातील परंपरेने चालत आलेल्या देहविक्रेय प्रथा स्वीकारण्यासाठी या तरुणीवर दबाव टाकला जात होता. परंतु, ती या कुप्रथेला विरोध करत राहिली. या दबावामुळे प्रथम ती नैराश्याने वेढली गेली आणि हळूहळू तिला मानसिक त्रास होऊ लागला. या जाचातून सुटण्यासाठी तिने राजस्थान येथील एकाशी प्रेमविवाह केला. परंतु, तोही तिला मद्यपान करून मारहाण करायचा. ज्यावेळी त्याला या तरुणीच्या कुटुंबात चालत आलेल्या असामाजिक प्रथेबद्दल कळले त्यावेळी त्याने आणखी त्रास देण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून ती पुन्हा आईकडे गेली असता, त्या दोघींमध्ये वाद झाला.
तिथूनही ती बाहेर पडली आणि पुन्हा पतीकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्या दरम्यान तिचा पती सूरतला कामाला असल्याचे कळले. त्याला शोधण्यासाठी ती सुरत ट्रेनमध्ये बसली आणि भ्रमिष्ट अवस्थेत मुंबईत आली. मुंबईत कशी आली, हे मात्र तिला आठवत नाही. रस्त्यावर भरकटलेल्या अवस्थेत असताना ती वाकोला पोलिसांना आढळली. त्यांनी प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. समुपदेशनानंतर अन्यायाची माहिती दिली, असे समाजसेवा अधीक्षक रंजना दोनोडे यांनी सांगितले.
कुटुंबाकडूनही आला नकारnसुरुवातीला ती घरचा पत्ता सांगत नव्हती. तिला तिच्या घरी आणि त्या असामाजिक प्रथेत जायचे नव्हते. नंतर तिचे समुपदेशन करून तिच्यात उत्साह निर्माण केला. nतिने पत्ता सांगितला खरा पण कुटुंबाकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही. आता तिच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. एखादी चांगली सामाजिक संस्था पुढे आल्यास तिथे तिचे पुनर्वसन केले जाईल, असे मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय बोदाडे यांनी सांगितले. nबरे झाल्यावर मनोरुग्णांचे सामाजिक पुनर्वसन होत नाही हा मोठा प्रश्न आहे. डॉ. बोदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रियांका बनोकर तिच्यावर उपचार केले आहेत.
स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा निर्धारपती आणि आई हे दोन पर्याय तिच्यासमोर असले तरी तिने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आणि त्या जिद्दीने भरारी घेण्याचा विचार प्रशासनाकडे तिने बोलून दाखवला आहे. तिच्या या जिद्दीचे कौतुक करून प्रशासन तिचा उत्साह वाढवत आहे आणि त्यादृष्टीने पुनर्वसनाचा प्रयत्नही करत आहे.